भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज रंगणार उपांत्य फेरीचा महामुकाबला
दुबई(वृत्तसंस्था)
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला उपांत्य सामना आज मंगळवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे. भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाला हरवण्याचे आव्हान आहे, जे सोपे नसेल. शेवटच्या वेळी २०११ च्या विश्वचषकात भारतीय संघाने बाद फेरीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतरच्या तीन बाद फेरीतील सामन्यांमध्ये भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याशिवाय, या सामन्यात ११ असे योगायोग तयार झाले आहेत, जे भारतीय संघाच्या बाजूने नाहीत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज मंगळवारी होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्याकडे जगभरातील क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे. या सामन्याच्या निमित्ताने भारतीय संघाकडे २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. मात्र, भारतासाठी हे आव्हान इतकेही सोपे नसेल. ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत आहेच, त्याचबरोबर भारतीय संघासमोर आणखी एक आव्हान आहे ते म्हणजे ट्रॅव्हिस हेडचं. कारण हेडने आजवर भारताविरोधात जबरदस्त कामगिरी केली आहे. तसेच हेडने आतापर्यंत दोन वेळा भारताकडून आयसीसी चषक अक्षरशः हिसकावला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. तसेच ट्रॅव्हिस हेडदेखील सज्ज आहे. त्यामुळे भारतीयांना धाकधुक लागली आहे.
आयसीसीने उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी खेळण्याच्या अटी स्पष्ट केल्या आहेत. पाऊस पडल्यास काय करावे हे स्पष्ट केले आहे. पावसामुळे सामना रद्द झाला तर कोणत्या संघाला अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळेल, हे देखील महत्त्वाचे आहे. भारत विरुद्ध आँस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य फेरीतील सामन्यात पाऊस पडला तर. पावसानंतरही सामना एकाच दिवशी संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. तसे न झाल्यास राखीव दिवशी पावसामुळे सामना जिथे थांबला होता तिथून सुरू केला जाईल. पावसामुळे सामना रद्द झाल्यास, अंतिम फेरीत जाणारा संघ टेबलद्वारे निश्चित केला जाईल. भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनल नवीन खेळपट्टीवर खेळवली जाईल. मैदान तेच असेल पण सामना नव्या खेळपट्टीवर खेळवला जाईल. अशा स्थितीत ही खेळपट्टी बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्याप्रमाणे असणार नाही. या खेळपट्टीच्या स्वरुपात बदल होणार आहे. त्याच वेळी, आयसीसीच्या देखरेखीखाली, अमिराती क्रिकेट बोर्डाने नवीन खेळपट्टी तयार केली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू सँडरी हा क्युरेटरच्या भूमिकेत आहे.