भारताचा ऑस्ट्रेलियावर दमदार विजय; चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताचा दिमाखात प्रवेश
दुबई(वृत्तसंस्था)
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. विराट कोहली पुन्हा एकदा भारताच्या मदतीला धावून आला. विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला धुळ चारली आणि सेमी फायनल सामन्यात दमदार विजय मिळवला. विराट कोहलीने भारताचा डाव सावरत यावेळी संघाला चार विकेट्स राखून विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. विराट कोहलीने यावेळी ८४ धावांची खेळी साकारली. हार्दिक पंड्याने अखेरच्या षटकांमध्ये तुफानी फटकेबाजी करत सामन्यात रंगत आणली. आता 12 वर्षांनी या स्पर्धेचं तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यापासून टीम इंडिया फक्त एक विजय दूर आहे. न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दुसऱ्या सेमी फायनलमधील विजेत्याशी भारताची लढत होईल. फायनल मॅच रविवारी (9 मार्च) दुबईत होणार आहे.
ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटिंग करत टीम इंडियासमोर २६५ रन्सचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या २६५ धावांचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्माने धडाकेबाज सुरुवात करून दिली. पण रोहितला यावेळी पुन्हा एकदा मोठी खेळी साकारता आली नाही. रोहित यावेळी २८ धावा करू शकला. शुभमन गिल या सामन्यात अपयशी ठरला आणि त्याला आठ धावांवर समाधान मानावे लागले. भारताने दोन्ही सलामीवीर गमावले असले तरी विराट कोहलीने ययावेळी श्रेयस अय्यरच्या साथीने भारताचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रचली. ही जोडी मोठी धावसंख्या उभारेल, असे वाटत होते.
पण त्यावेळी श्रेयस अय्यर हा ४५ धावांवर बाद झाला आणि ही जोडी फुटली. पण त्यानंतर विराट कोहलीने धावांचा ओघ सुरुच ठेवला. विराट कोहलीने आपले अर्धशतक साकारले आणि त्यानंतर त्याने धावांचा ओघ वाढवला. विराटने अर्धशतकानंतरही आपला आक्रमकपणा सोडला नाही. चुकीच्या चेंडूवर तो चौकार वसूल करत होता. यावेळी विराटने अक्षर पटेलला आपल्या साथीला घेतले आणि विजयाची वीटा रचायला त्याने पुन्हा सुरुवात केली. अक्षर बाद झाल्यावर लोकेश राहुलच्या साथीने विराटने पुन्हा धावा जमवायला सुरुवात केली. पण या प्रयत्नामध्ये विराट कोहलीचे शतक हुकले. अखेर केएल राहुलनं सिक्सर लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.