आदर्श पतसंस्थेने एक हजार कोटी एकत्रीत व्यवसायाचा टप्पा ओलांडला….
अलिबाग (प्रतिनिधी):
आदर्श नागरी सहकारी पतसंस्था , अलिबाग या संस्थेने एक हजार कोटी रूपयांचा एकत्रीत व्यवसायाचा टप्पा ओलांडला आहे. एक हजार कोटी रूपयांचा पल्ला गाठणारी आदर्श ही रायगड जिल्ह्यातील पहिली पतसंस्था ठरली आहे, अशी माहिती आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील व अध्यक्ष अभिजित पाटील यांनी बुधवार (दि. 21) पत्रकार परिषदेत दिली.
आदर्श पतसंस्था बँकींग क्षेत्रात आता अर्बन बँकांप्रमाणे काम करत आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना 1998 रोजी झाली. अवघ्या 27 वर्षांमध्ये रायगड जिल्ह्यात 1003 कोटी रूपयांचा व्यवसाय पूर्ण केला आहे. ठेवी रु. 558 कोटींच्या असून रु. 445 कोटीं रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. 2024 - 2025 या आर्थिक वर्षापर्यंत आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने रु. 752 कोटी 77 लाख रूपयांचा एकत्रित व्यवसाय केला होता. मार्च 2026 पर्यंत रु. 1000 कोटी रूपयांचा एकत्रीत व्यवसाय करण्याचे आम्ही उद्दीष्ट ठेवले होते . परंतु सभासदांनी संस्थेवर अतूट विश्वास दाखवला म्हणून दहा महिन्यात आम्ही 250 कोटी रूपयांचा एकत्रीत व्यवसाय केला. आज आदर्शचा एकत्रीत व्यवसाय 1003 कोटी रूपयांचा झाला आहे. संस्थेचा रु. 1003 कोटी रुपयांपेक्षा जास्त एकत्रित व्यवसाय असूनही ग्रॉस एन पी ए प्रमाण 1 टक्क्यापेक्षा कमी असलेली आदर्श ही राज्यात अग्रगण्य पतसंस्था आहे.
आदर्शचे कार्यक्षेत्र राज्यस्तरीय आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे , मुंबई या जिल्हांमध्ये कार्यक्षेत्र आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या एकूण 22 शाखा आहेत. एक स्वतंत्र गोल्ड शाखा सुरू केली. दोन शाखा पुण्यात आहेत. पुण्यातील एक पतसंस्थेचे विलीनीकरण केले. या सर्व शाखा नफ्यात आहेत. सर्व शाखांंच्या व्यवसायात वाढ झाली आहे. त्यामुळे आम्ही 1003 कोटी रूपयांचा व्यवसायाचा टप्पा गाठू शकलो. भविष्यात राज्यातील पहिल्या पाच पतसंस्थामध्ये आदर्शला नेण्याचे आमचे उद्दीष्ट आहे, असे संस्थापक श्री . सुरेश पाटील यांनी सांगितले.
कर्ज वसूली करताना कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही. आदर्श परिवारातील प्रत्येक कर्मचार्याने स्वतःला झोकून देऊन काम केलेे. त्यांची मेहनत, संस्थांपकांची इच्छाशक्ती यामुळे हा पल्ला गाठता आला.आदर्श पतसंस्था वित्तीयदृष्ट्या सुदृढ आणि सुव्यवस्थापित (एफएसडब्ल्यूएम) आहे . 31 मार्च 2026 पर्यंत आदर्शचा ग्रॉस एनपीए ०१ टक्क्यापेक्षा कमी ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे आदर्शचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी सांगितले .
सर्व शाखांमधील कर्मचार्यांनी प्रामणिकपणे काम केले. ठेवी जमा केल्या, चांगली कर्ज वसूली केली. सभासदांना चांगली सेवा दिली , ग्राहकांचा विश्वास संपादीत केला . त्यामुळे पतसंस्थाबाबत अविश्वासाचे वातावरण असताना आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेवर मात्र ग्राहकांचा विश्वास वाढतच आहे. आदर्शच्या व्यवसायात झपाट्याने वाढ होत आहे , असे आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील म्हणाले.

