Home

आंबेपुर मतदारसंघ हादरला! भाजपच्या चित्रा पाटील यांना जबर धक्का; कुसुंबळे ग्रामपंचायतीचा शिवसेनेत सामूहिक प्रवेश


 आंबेपुर मतदारसंघ हादरला! भाजपच्या चित्रा पाटील यांना जबर धक्का; कुसुंबळे ग्रामपंचायतीचा शिवसेनेत सामूहिक प्रवेश


अलिबाग, ता. १८(वार्ताहर) जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होत असतानाच आंबेपुर गणात राजकीय भूकंप घडला आहे. भाजपच्या संभाव्य उमेदवार चित्रा पाटील यांना मोठा, अनपेक्षित आणि निर्णायक धक्का बसला असून कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकत थेट शिवसेनेत प्रवेश केला आहे. या सामूहिक पक्षप्रवेशामुळे आंबेपुर गणातील भाजपचे बळ अक्षरशः कोलमडले असून निवडणुकीला खऱ्या अर्थाने आक्रमक वळण मिळाले आहे.


भाजपच्या चित्रा पाटील यांच्या अत्यंत जवळच्या आणि विश्वासू समजल्या जाणाऱ्या कार्यकर्त्या प्रतिक्षा पाटील, ज्या कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच होत्या. त्यांनीच शिवसेनेचा भगवा हाती घेतल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. केवळ एवढेच नव्हे, तर ग्रामपंचायत सदस्य बजरंग पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत झालेला प्रवेश हा चित्रा पाटील यांच्या राजकीय ताकदीवर थेट घाव मानला जात आहे. जिल्हा परिषद निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने आंबेपुर गणात आखलेली गणिते या एका धक्क्याने कोलमडल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. ज्या कुसुंबळे ग्रामपंचायतीवर भाजप आपला किल्ला असल्याचा दावा करत होती, तोच किल्ला आता शिवसेनेने सर केला आहे. त्यामुळे आंबेपुर गणात भाजप बचावात्मक पवित्र्यात गेल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. या पक्षप्रवेशामागे अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांची आक्रमक कार्यपद्धती, थेट जनसंपर्क आणि स्थानिक विकासाचा धडाका हे प्रमुख कारण असल्याचे नव्याने शिवसेनेत दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. 'फक्त आश्वासने नाहीत, तर प्रत्यक्ष काम करणारे नेतृत्व आम्हाला हवे होते, आणि ते शिवसेनेत दिसले,' असा थेट टोला भाजपला लगावत कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली.


हा भव्य पक्षप्रवेश सोहळा जिल्हा परिषदेच्या माजी प्रतोद मानसी दळवी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी आणि आंबेपुर गटाच्या शिवसेना उमेदवार रसिकाताई केणी यांच्या उपस्थितीत रविवार (ता.१८) रोजी राजमळा येथे पार पडला. यावेळी उपस्थित नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत 'आंबेपुर गण आता बदलासाठी सज्ज आहे, आणि हा बदल शिवसेनेच्या माध्यमातूनच घडणार,' असा निर्धार व्यक्त केला. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या आणि त्यांची स्थानिक पकड पाहता हा प्रवेश केवळ औपचारिक नसून, निवडणूक निकालांवर थेट परिणाम करणारा असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. माजी सरपंच प्रतिक्षा पाटील, महेश पाटील, बजरंग पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती पाटील, सुशिल पाटील, सचिन पाटील, विद्याधर पाटील, नरेंद्र पाटील, सुशांत पाटील, अरविंद कोठेकर, अनंत पाटील, चंद्रकांत पाटील, विनय पाटील, चैतन्य पाटील, हर्ष पाटील, मालती पाटील, सुनिता पाटील, भूमिका पाटील, सुनील पाटील, सुजाता पाटील, नाजुका पाटील, धन्यता पाटील, आशा पाटील, समिक्षा पाटील, वंदना पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.


या घडामोडीमुळे आंबेपुर गणात शिवसेनेचा आत्मविश्वास दुणावला असून भाजपसाठी ही निवडणूक अधिक कठीण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच भाजपच्या संभाव्य उमेदवाराला बसलेला हा धक्का म्हणजे येणाऱ्या निवडणूक संघर्षाची नांदी मानली जात असून, आंबेपुर गणात आता 'शिवसेना विरुद्ध भाजप' ही लढत अधिक धारदार होणार, यात शंका उरलेली नाही.

Previous Post Next Post