Home

गुढीपाडवा... कवयित्री सुजाता सोनवणे


 गुढीपाडवा


चैत्र गुढीपाडवा आला दारी

गुढी उभारूया मांगल्याची 

स्वागत मराठी नववर्षाचे

कास धरूया नवोपक्रमांची.


श्रीराम व शिवछत्रपतींची 

विजय पताका अभिमानाची

चैत्रपालवी मनामनात उजळून 

गुढी उभारूया नवसामर्थ्याची.


ब्रह्मदेवाने विश्व निर्मिले

श्रीराम अयोध्येत परतले 

साजरा मराठी नववर्षारंभ

उखडून टाका मनातील दंभ.


नैराश्याची मरगळ झटकून 

गुढी उभारू नवचैतन्याची 

मराठी भाषा हिंदू संस्कृती 

गुढी भाषा सक्षमीकरणाची.


जीवन मंदिराच्या कलशात 

जल भरूया निर्मळ प्रेमाचे

कडुनिंबमिश्रित साखरप्रसाद 

जपावे खास भान आरोग्याचे.


प्रगतीपथ गाठताना प्यावे 

लागतात अनंत कडू घोट 

सुरेल जीवनगाणे गुणगुणत 

राहावे धरून सदगुरुंचे बोट.


काढूया मनातील अढी

जपूया संस्कृतीची रूढी

सुखी समृद्धी जीवन जगत 

माधुर्याची उभारूया गुढी.


सौ.सुजाता सोनवणे.

सिलवासा दा.न.ह.

Previous Post Next Post