प्रसिद्ध मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन
मुंबई(वार्ताहर)
मराठी चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अप्पी आमची कलेक्टर' आणि लाखात एक आमचा दादा फेम टीव्ही अभिनेता संतोष हणमंत नलावडे यांचे अपघाती निधन झालं आहे. ते 49 वर्षाचे होते. नांदेड येथे झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या अपघाती निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. तर त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष नलावडे हे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील एका विभागात कार्यरत होते. अभिनयाची आवड असल्याने नोकरी करतानाच त्यांनी अभिनय करण्यासही सुरुवात केली. 'अप्पी आमची कलेक्टर', 'मन झालं बाजींद', 'कॉन्स्टेबल मंजू', 'लागीर झालं जी', 'लाखात एक आमचा दादा' यासारख्या मालिकांमध्ये संतोष नलावडे यांनी काम केलं होतं. अभिनयाची आवड असूनही, त्यांनी शासकीय नोकरीही तितक्याच निष्ठेने सांभाळली. आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली.
संतोष हे नांदेडमध्ये विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी गेले होते. मात्र, तिथेच एका अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच सोमवारी दुपाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबासह मराठी मनोरंजन विश्वावावर शोककळा पसरली आहे.. त्यांच्या मूळ गावी वाढे (ता. सातारा) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संतोष नलावडे हे त्यांच्या मनमिळावू स्वभाव आणि साध्या राहणीमानासाठी ओळखले जात होते. ४९ वर्षांच्या अल्पायुष्यात त्यांनी आपल्या अभिनयाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यांच्या अपघाती निधनाने त्यांचे कुटुंब, मित्र, नातेवाईक आणि असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
