Home

कुंभार्ली घाटात २०० फूट खोल दरीत कार कोसळली; आईसह मुलाचा मृत्यू; दोन दिवसांनी घटना उघडकीस


 

कुंभार्ली घाटात २०० फूट खोल दरीत कार कोसळली; आईसह मुलाचा मृत्यू; दोन दिवसांनी घटना उघडकीस

चिपळूण(प्रतिनिधी)

कराड-चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटात रविवारी रात्री सुमारे २०० फूट खोल दरीत कार कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली. शोध मोहिमेनंतर मंगळवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. या अपघातात आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला. विश्वजित जगदीश खेडेकर (वय ४२), सुरेखा जगदीश खेडेकर (६५, दोघेही रा.कुंभार्ली) अशी मृतांची नावे आहेत.

विश्वजित व सुरेखा जगदीश खेडेकर हे दोघे यात्रेसाठी कारने पुणे येथून गावी कुंभार्लीकडे येत होते. पाटण येथे रविवारी रात्री ८.३० वाजता जेवण आटोपून पुढील प्रवासाला निघाले. रात्री १० च्या सुमारास कुंभार्ली घाटातील पोलीस चौकी पासून कार पुढे निघून गेली मात्र चौकीपासून तिसऱ्या अवघड वळणावर सुमारे दोनशे फूट खोल दरीत कार कोसळली. यावेळी आजूबाजूला कोणीही नव्हते. त्यामुळे ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. मात्र रविवारी उशिरापर्यंत ते दोघेही घरी पोहचले नाही. पती जगदीश खेडेकर तेव्हापासून सलग दोन दिवस पत्नीच्या व मुलाच्या मोबाईलवर संपर्क साधत होते. दोघांच्याही मोबाईलची रिंग वाजत होती. परंतु  संपर्क झाला नाही. अखेर मंगळवारी पती जगदीश खेडेकर यांनी पत्नी व मुलगा बेपत्ता असल्याची पोलिसांत खबर दिली. त्याप्रमाणे पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली. 

पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने कुंभार्ली घाटातील दरीत शोध घेतला असता काळ्या रंगाची सफारी गाडी दिसून आली. त्याठिकाणी ग्रामस्थांच्या मदतीने पोहचून पाहिले असता दोघेही मृतावस्थेत आढळून आले. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भरत लब्ध्ये यांचे खेडेकर हे नातेवाईक आहेत. त्यांनी ग्रामस्थांसह तात्काळ घटनास्थळी पोहचून रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढले. या भीषण अपघातानंतर कुंभार्ली गावातही हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे खेडेकर कुटुंबीयांवरती मोठा आघात झाला आहे. जगदीश खेडेकर यांच्या वडिलांचे ही सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले. त्यानंतर खेडेकर यांना पत्नी व मुलाच्या मृत्यूमुळे हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. या अपघाताची नोंद अलोरे शिरगाव पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. विश्वजित खेडेकर हे पुणे येथे एका नामवंत कंपनीत नोकरीला होते. त्यांची पत्नी डॉक्टर असून ते पुणे येथेच वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दीड वर्षाची मुलगी असा परिवार आहे.

Previous Post Next Post