मुंबईतील बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; आतापर्यंत १०१ जणांना वाचवण्यात यश
मुंबई(प्रतिनिधी)
मुंबईच्या समुद्रात प्रवासी बोटीला स्पीड बोटीनं दिलेल्या धडकेत आतापर्यंत १३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अपघात झाल्यानंतर यंत्रणेनं बचावकार्य हाती घेतलं होतं. आतापर्यंत १०१ जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती देण्यात आली. १३ मृतांमध्ये नौदलाच्या तिघांचा समावेश आहे. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नौदलाच्या बोटीला नवीन इंजीन लावले होते. त्या इंजिनाची चाचणी घेतली जात होते. त्या चाचणीच्या वेळी इंजीनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे बोटीवरील ताबा गेला. त्यानंतर भरधाव असणारी ही बोट नीलकमल बोटीवर आदळली आणि अपघात झाला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नीलकमल आणि नौदलाची स्पीड बोट यांच्या झालेल्या या अपघातात १३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
या १३ लोकांमध्ये १० नागरिक आहेत. तीन नौदलाचे कर्मचारी आहेत. दोन व्यक्ती गंभीर जखमी आहेत. त्यांना नौदलाच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. ११ नौदलच्या स्पीड बोट आणि ४ हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सर्वांना वाचवण्यात आले आहे. आज संध्याकाळी ७.३० पर्यंत ही माहिती मिळाली आहे. अधिक माहिती गुरुवारी सकाळ मिळेल. कोणी मिसिंग असेल तर उद्या सकाळपर्यंत कळले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दुर्घटनेत ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. या घटनेची चौकशी मुंबई पोलीस आणि नौदल करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
