सलाम शुभेच्छांना
भेटत नाही,दिसत नाही,पण सहवास मात्र कायम जाणवतो.. असतो आणि राहणार याची मात्र कायम साक्ष देत शुभेच्छातून व्यक्त होते, हीच असते मैत्री..?
स्पर्धेच्या जगात श्वास घ्यायला जागा नाही,तरीही सुख दुःखात वेळ काढून आधार देवून जिवंत सोबतीला उभी असते, कुठेतरी..हीच असते मैत्री..!
थकल्या भागल्या आयुष्यात कुठेतरी निवांत बसावं..असं वाटत असतं मनाला...आणि कुठून तरी दुरून आवाज येतो, कशी काहेस? जी प्रेमाने विचारते,.. हीच असते मैत्री..!
काही देत नाही,काही घेत नाही,अपेक्षा तर कधी ठेवत नाही,पण ओळख जुनी विसरतही नाही,कायम धाग्यात गुंफून राहते,..हीच असते मैत्री !
मित्र मैत्रिणी खूप सारे,पण त्यातही असे मैत्रीचा एक कट्टा,जो कुठेतरी खास मैत्रीच्या डायरीत जपून आहे,तुमच्याही अन् माझ्याही..हीच असते मैत्री..!
कधी अचानक समोर येते..अन इतका काय आनंद होतो,किती वर्षाने भेटलो म्हणून गप्पांना रंग चढतो,कधी न पाहिलेला आनंद जेव्हा त्या भेटण्यातून जगतो.. हीच असते मैत्री..!
मित्र असो व मैत्रीण भेटते जेव्हा चुकून किती अन् काय काय बोलावं,मनाला फुटतो पाझर आठवणींचा..आणि त्यातून खळ खळून निरागस हस्य फुलून येते..तीच असते मैत्री.. खरच हीच असते मैत्री..!
सौ जान्हवी भोईर
नवी मुंबई नेरुळ
