Home

एक दिवस तरी वारी अनुभवावी : आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय दिंडी उत्साहात संपन्न

 एक दिवस तरी वारी अनुभवावी : आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय दिंडी उत्साहात संपन्न


अलिबाग(प्रतिनिधी)

 आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था, लायन्स क्लब ऑफ अलिबाग व माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने "एक दिवस तरी वारी अनुभवावी" या संकल्पनेतून भव्य पायी दिंडी व भक्तिमय वारीचे आयोजन करण्यात आले. सकाळी ७.०० वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, अलिबाग येथून प्रारंभ झालेली ही वारी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, वरसोली येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाली.

या वारीमध्ये रामनाथ मराठी शाळेतील सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. टाळ-मृदंगाच्या गजरात "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" च्या अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यावेळी लायन्स क्लबचे पदाधिकारी, विविध बचत गटांतील महिला, नागरिक, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेचे कर्मचारी तसेच अनेक वारकरी भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या उपक्रमाला धर्मादाय आयुक्त राजेश इंगोले, निरीक्षक सुनील साळुंखे, डॉ. विजय कोकणे, जागृती फाउंडेशनच्या जागृती बेलेकर, लायन्स क्लबचे प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकरी भक्तांसाठी जागृती फाउंडेशनच्या जागृती बेलेकर यांच्या वतीने चहा, नाश्ता, पिण्याचे पाणी तसेच आवश्यक साहित्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली. याशिवाय अनेक भक्तांना कुर्ते व सदरे वाटप करून सेवाभावाचा आदर्श घालून देण्यात आला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव/चव्हाण, माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम मायाप्पा हुलवान, उपाध्यक्ष श्री. महेंद्र पाटील व खजिनदार डॉ. नितीन गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात पार पडले.

विशेष म्हणजे, संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव/चव्हाण यांनी स्वतः अलिबाग ते वरसोली असा संपूर्ण पालखी सोहळा खांद्यावर पालखी घेत पायी पूर्ण केला.

विठ्ठलभक्तीचा हा अविस्मरणीय अनुभव त्यांच्या जीवनातील अत्यंत आनंददायी व प्रेरणादायी क्षण ठरला. त्यांच्या या भक्तिभावाने उपस्थित वारकरी आणि नागरिकांनाही प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माथाडी कामगार संघटना, सर्व स्वयंसेवक, सामाजिक संस्था, मान्यवर, रामनाथ मराठी शाळेचे विद्यार्थी, महिला बचत गट, लायन्स क्लब ऑफ अलिबाग, जागृती फाउंडेशन तसेच सर्व वारकरी भक्तांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.

"एक दिवस तरी वारी अनुभवावी" हा संदेश समाजापर्यंत पोहोचवत भक्ती, सेवा, संस्कार आणि सामाजिक एकात्मतेचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला. उपस्थितांनी हा उपक्रम दरवर्षी आयोजित करण्याची अपेक्षाही व्यक्त केली.

Previous Post Next Post