Home

विद्यार्थ्यांवरील लाठीमाराविरोधात काँग्रेसचा एल्गार! अलिबागमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा सरकारविरोधात आक्रोश

 विद्यार्थ्यांवरील लाठीमाराविरोधात काँग्रेसचा एल्गार! अलिबागमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा सरकारविरोधात आक्रोश


अलिबाग (ओमकार नागावकर) : 

विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अन्यायकारक लाठीमाराच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याच्या सरकारच्या धोरणाविरोधात अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीने गुरुवारी (२३ जुलै) आक्रमक पवित्रा घेतला. ‘विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे’ आणि ‘लोकशाही व संविधानाचे रक्षण झालेच पाहिजे’ अशा घोषणांनी अलिबाग शहर दणाणून गेले. निदर्शने, जोरदार घोषणाबाजी आणि भव्य रॅलीद्वारे काँग्रेसने सरकारविरोधात आपला संताप व्यक्त केला.

अलिबाग येथील बॅरिस्टर ए. आर. अंतुले भवन (काँग्रेस भवन) परिसरात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. हातात तिरंगा, काँग्रेसचे झेंडे आणि सरकारच्या धोरणांचा निषेध करणारे फलक घेत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात केली.

विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करत आंदोलकांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांचा आवाज दडपून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांनी अलिबाग शहरातून भव्य निषेध रॅली काढली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही रॅली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. येथे डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधान आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणाची शपथ घेण्यात आली. त्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.

यावेळी अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील दशरथ थळे यांनी सरकारवर निशाणा साधत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसचा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.

“विद्यार्थी आणि तरुणांचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न काँग्रेस सहन करणार नाही. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील. आज अलिबागमध्ये झालेला हा जनआक्रोश केवळ एका आंदोलनापुरता मर्यादित नसून अन्यायाविरोधात उभ्या राहणाऱ्या लोकशक्तीचा आवाज आहे. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठीचा हा लढा यापुढेही अधिक ताकदीने सुरू राहील,” असे थळे यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनाला अलिबाग तालुका काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, युवा काँग्रेस, एनएसयूआयचे कार्यकर्ते, महिला आघाडीच्या प्रतिनिधी, विद्यार्थी संघटनांचे सदस्य तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला.

आंदोलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिकांचे तालुका काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष सुनील थळे यांनी आभार मानले.

Previous Post Next Post