Home

विधान परिषद निवडणुक निकाल २०२६: महायुतीचा १७ पैकी १६ जागांवर विजय

  विधान परिषद निवडणूक निकाल २०२६: महायुतीचा १७ पैकी १६ जागांवर विजय

नाशिकमध्ये शिंदे गटाच्या उमेदवाराचा धक्कादायक पराभव, गोकुळ गीते विजयी


      मुंबई (प्रतिनिधी)


 महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण १७ जागांपैकी ६ जागा बिनविरोध जिंकल्यानंतर उर्वरित ११ जागांपैकी १० जागांवर विजय मिळवत महायुतीने १६ जागांवर विजयाची नोंद केली. मात्र, नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी शिवसेना (शिंदे गट) उमेदवाराचा पराभव करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले असले तरी अनेक मतदारसंघांत क्रॉस व्होटिंग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महायुतीच्या अनेक विजयी उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली.

नाशिकमध्ये गोकुळ गीते यांची मोठी बाजी

नाशिक मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा करूनही अखेर विजय मिळवला. त्यांनी ३५७ मते मिळवत शिवसेना (शिंदे गट) उमेदवार किशोर (नरेंद्र) दराडे यांचा २४८ मतांनी पराभव केला.

राजकीय वर्तुळात या निकालाची मोठी चर्चा सुरू असून, भाजपसह काही विरोधी मतांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या काही मतांचीही साथ गीते यांना मिळाल्याची चर्चा आहे. या पराभवानंतर शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

महायुतीचे राज्यभर वर्चस्व

१८ जून रोजी झालेल्या मतदानानंतर जाहीर झालेल्या निकालात महायुतीच्या उमेदवारांनी बहुतेक मतदारसंघांत विजय मिळवला.


विजयी उमेदवार

▪️नागपूर: डॉ. राजीव पोतदार (भाजप)

▪️नांदेड: अमर राजूरकर (भाजप)

▪️सांगली-सातारा: धैर्यशील कदम (भाजप)

▪️परभणी-हिंगोली: सईद खान (शिवसेना)

▪️लातूर-बीड-धाराशिव: बसवराज पाटील (भाजप)

▪️सोलापूर: राजेंद्र राऊत (भाजप)

▪️छत्रपती संभाजीनगर-जालना: सुहास शिरसाट (भाजप)

▪️अमरावती: प्रवीण पोटे-पाटील (भाजप)

▪️भंडारा-गोंदिया: अविनाश ब्राम्हणकर (भाजप)

▪️जळगाव: नंदकिशोर महाजन (भाजप)

▪️नाशिक: गोकुळ गीते (अपक्ष)


बिनविरोध विजयी उमेदवार

▪️भाजप

प्राजक्त तनपुरे (अहिल्यानगर)

अरुण लखानी (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली)


▪️शिवसेना (शिंदे गट)

रवींद्र फाटक (ठाणे)

दुष्यंत चतुर्वेदी (यवतमाळ)


▪️राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

अनिकेत तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग)

विक्रम काकडे (पुणे)

क्रॉस व्होटिंगची चर्चा

या निवडणुकीत अनेक ठिकाणी पक्षादेशाच्या विरोधात मतदान झाल्याचे दिसून आले. महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाले नसले तरी काही मतदारसंघांत त्यांनी महायुतीची मते विभागण्यात यश मिळवले. दुसरीकडे अमरावतीमध्ये काँग्रेस उमेदवाराला एकही मत मिळाले नसल्याची बाब चर्चेचा विषय ठरली.

महायुतीने एकूण १७ पैकी १६ जागांवर विजय मिळवत विधान परिषदेत आपले संख्याबळ अधिक मजबूत केले आहे. मात्र नाशिकमधील निकालामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना आणि समीकरणांना सुरुवात झाली आहे.


Previous Post Next Post