Home

2029 मध्ये सर्व आमदार शिवसेनेच्याच तिकिटावर लढतील! 'ऑपरेशन टायगर'नंतर एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

  2029 मध्ये सर्व आमदार शिवसेनेच्याच तिकिटावर लढतील!  'ऑपरेशन टायगर'नंतर एकनाथ शिंदेंचा मोठा दावा


      मुंबई (प्रतिनिधी)


शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर' मोहिमेबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा दावा केला आहे. "आम्ही कोणतेही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही. सर्व प्रक्रिया कायदेशीररीत्या पूर्ण झाल्या असून सर्व खासदार आनंदाने मूळ शिवसेनेत परतले आहेत," असे ते विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.


*'विरोधक फक्त चर्चा करत होते'*

शिंदे म्हणाले, "पक्ष प्रवेशाच्या घोषणेनंतर विरोधक विविध प्रकारच्या चर्चा करत होते. हा आमच्या संपर्कात आहे, तो आमच्या संपर्कात आहे, अशा अफवा पसरवल्या जात होत्या. मात्र, आम्ही सर्व खासदारांना एकत्र आणून दाखवले. आमचे कोणतेही ऑपरेशन अर्धवट राहत नाही." ते पुढे म्हणाले की, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या असून खासदार समाधानी आहेत. "आधीचे आणि नव्याने परतलेले खासदार अशा मोठ्या टीममुळे शिवसेना अधिक मजबूत झाली आहे," असा दावा त्यांनी केला.


*2029 लोकसभा निवडणुकीसाठी मोठा दावा*

2029 च्या लोकसभा निवडणुकीबाबत आत्मविश्वास व्यक्त करत शिंदे म्हणाले, "सर्व खासदार आगामी लोकसभा निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावरच लढतील आणि विजयी होतील." खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भातील प्रश्नावर मात्र त्यांनी अधिक भाष्य टाळत, "तो त्यांचा विषय आहे," एवढेच सांगितले.


*संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर*

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना शिंदे म्हणाले, "कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे. आमचे नेते पोकळ धमक्यांना घाबरत नाहीत. जेवढी आमच्यावर टीका होते, तेवढे विरोधक राजकीयदृष्ट्या मागे जातात आणि आमची ताकद वाढते."


*दादरमध्ये नवीन शिवसेना भवन उभारणार*

यावेळी शिंदे यांनी दादरमध्ये नवीन शिवसेना भवन उभारण्याची घोषणा केली. ते म्हणाले, "शिवसेना आणि संघटना विस्तारत आहे. वाढत्या कामकाजासाठी स्वतंत्र आणि मोठ्या कार्यालयाची गरज आहे. त्यामुळे दादरमध्ये नवीन शिवसेना भवन उभारण्यात येणार आहे."


*महाराष्ट्राला 12 लाख कोटींचा निधी मिळाल्याचा दावा*

राज्यातील विकासकामांबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, विविध विभागांकडून निधीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 12 लाख कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी देताना कोणतीही कसर ठेवत नाहीत, असा दावाही त्यांनी केला.


*गोकुळ गितेंबाबत स्पष्टीकरण*

नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले गोकुळ गिते यांच्याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले, "ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे ते थेट शिवसेनेत प्रवेश करू शकत नाहीत. ते सहयोगी सदस्य म्हणून आमच्यासोबत काम करत आहेत."


*समान नागरी कायद्यावरही भूमिका स्पष्ट*

समान नागरी कायद्याच्या (UCC) मुद्द्यावर बोलताना शिंदे म्हणाले, "देशात समान नागरी कायदा असावा, ही बाळासाहेब ठाकरे यांची स्पष्ट भूमिका होती. काहीजण त्यांच्या वक्तव्याचा अर्धवट संदर्भ देतात. प्रत्यक्षात संबंधित विधान एका मेळाव्यातील भाषणाच्या संदर्भात होते." यासोबतच त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, शिवसेनेचा अजेंडा हा विकासाचा असून संघटन विस्तारासह राज्याच्या विकासावर सरकारचे लक्ष केंद्रित आहे.


Previous Post Next Post