Home

शेतकरी आत्महत्येच्या वेदनेवर भाष्य करणाऱ्या “सावित्री: हरणार नाही... लढणार” कादंबरीचे प्रकाशन

शेतकरी आत्महत्येच्या वेदनेवर भाष्य करणाऱ्या “सावित्री: हरणार नाही... लढणार” कादंबरीचे प्रकाशन

ग्रामपंचायत अधिकारी विजयकुमार ठेंगेकर यांचे कौतुक

यवतमाळ (प्रतिनिधी)


यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी लेखक विजयकुमार ठेंगेकर यांच्या समवेत “सावित्री: हरणार नाही... लढणार” या शेतकरी आत्महत्येच्या गंभीर विषयावर आधारित कादंबरीचे प्रकाशन केले. हा प्रकाशन सोहळा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात अगदी साधेपणाने पार पडला.

यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की म्हणाले,

“यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्यांच्या समस्येमुळे संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत साहित्याच्या माध्यमातून समाजाला वास्तवाची जाणीव करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘सावित्री: हरणार नाही... लढणार’ ही कादंबरी केवळ एका कुटुंबाची कथा नसून ती संघर्ष, जिद्द आणि आशेचा संदेश देणारी प्रेरणादायी कलाकृती आहे. समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेऊन त्यांना मानसिक व सामाजिक आधार देण्याची गरज आहे.”

तसेच त्यांनी लेखक विजयकुमार ठेंगेकर यांच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक करत, ग्रामीण वास्तव आणि शेतकरी कुटुंबांच्या भावना प्रभावीपणे मांडल्याबद्दल अभिनंदन केले.

लेखक विजयकुमार ठेंगेकर यांनी कादंबरीच्या लेखनामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, शेतकरी आत्महत्यांमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबांचे वास्तव समाजासमोर आणण्याचा आणि संघर्षातून उभारी घेण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या कादंबरीतून करण्यात आला आहे.

या प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) जालिंदर आभाळे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) युवराज मेहत्रे व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post Next Post