वर्तमान जगण्याची खरी कला
भूतकाळ माणसाला अनुभव देतो...भविष्य त्याला स्वप्नं दाखवतं...पण खरं आयुष्य मात्र वर्तमानातच श्वास घेत असतं. अनेकदा आपण आयुष्य जगताना दोन टोकांमध्ये अडकून पडतो... एक म्हणजे मागे घडलेल्या गोष्टींचा पश्चाताप आणि दुसरं म्हणजे उद्याची अनिश्चित चिंता. या दोन्ही गोष्टींच्या गर्दीत “आज” नावाचा क्षण नकळत हरवून जातो. आणि जेव्हा माणूस वर्तमान हरवतो... तेव्हा त्याचं जगणं केवळ अस्तित्वापुरतं उरतं.
“भूतकाळातून शिकावं, भविष्याची तयारी करावी... पण खरं आयुष्य मात्र वर्तमानातच जगावं.” या एका ओळीत संपूर्ण जीवनाचं सार दडलं आहे. कारण भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्य अजून आलेलं नसतं. आपल्या हातात फक्त आजचा दिवस असतो. पण दुर्दैवाने आपण त्यालाच सर्वात कमी महत्त्व देतो.
भूतकाळ प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. काही आठवणी गोड असतात... काही जखमा खोल असतात. कुणाला अपयश विसरता येत नाही...तर कुणाला विश्वासघात. अनेक जण आयुष्यभर जुन्या चुका उराशी बाळगून जगतात. “त्या वेळी असं केलं असतं तर?”, “तो निर्णय चुकीचा होता”, “ती व्यक्ती आयुष्यात आली नसती तर?” अशा प्रश्नांच्या ओझ्याखाली ते वर्तमान हरवून बसतात. पण वास्तव हे आहे की, भूतकाळ हा शिक्षक असतो, निवासस्थान नाही. त्याच्याकडून शिकायचं असतं...त्यात कायम अडकून राहायचं नसतं.
जसं एखादा विद्यार्थी परीक्षेत कमी गुण मिळाल्यावर पुढच्या वेळी अधिक मेहनत घेतो... तसंच जीवनातही चुका या शिकण्यासाठी असतात. पडल्याशिवाय चालायला शिकता येत नाही. अपयशाशिवाय यशाची किंमत समजत नाही. त्यामुळे भूतकाळाकडे दुःख म्हणून नव्हे, तर अनुभव म्हणून पाहायला शिकणं गरजेचं आहे. कारण अनुभव हेच आयुष्याचं खरं विद्यापीठ असतं.
दुसरीकडे भविष्याची चिंता माणसाला आतून पोखरत असते. “उद्या काय होईल?”, “करिअरचं काय?”, “पैसे पुरतील का?”, “लोक काय म्हणतील?” अशा हजारो विचारांनी मन सतत अस्वस्थ राहतं. माणूस भविष्याच्या भीतीने इतका व्यापून जातो की, आज समोर असलेल्या आनंदालाही तो अनुभवू शकत नाही. अनेक लोक आयुष्यभर भविष्य सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात राहतात; पण जेव्हा मागे वळून पाहतात तेव्हा लक्षात येतं की त्यांनी वर्तमानच जगलं नाही.
खरंतर भविष्याची तयारी करणं चुकीचं नाही. प्रत्येकाने स्वप्न पाहावीत, ध्येय ठरवावीत, मेहनत करावी. पण त्या तयारीच्या नादात वर्तमानाची सुंदरता हरवू नये. कारण उद्याचं भविष्यही आजच्या वर्तमानातूनच घडत असतं. जर आजचा दिवस चिंतेत गेला तर उद्याही तसाच जाणार. आणि म्हणूनच वर्तमानात शांत राहणं, आनंद शोधणं आणि प्रत्येक क्षण मनापासून जगणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
आजच्या धावपळीच्या जगात माणूस स्वतःपासूनच दूर जात आहे. मोबाईल, सोशल मीडिया, स्पर्धा, पैसा, प्रतिष्ठा यांच्यामध्ये तो एवढा गुरफटून गेला आहे की त्याला स्वतःसाठी वेळच उरलेला नाही. घरात सगळे एकत्र असतात, पण संवाद हरवलेला असतो. चेहऱ्यावर हसू असतं, पण मनात समाधान नसतं. कारण माणूस वर्तमानात राहतच नाही. तो कधी जुन्या आठवणींमध्ये हरवलेला असतो तर कधी उद्याच्या ताणात अडकलेला असतो.
वर्तमानात जगणं म्हणजे फक्त मजा करणं नव्हे... तर प्रत्येक क्षणाची जाणीव ठेवून जगणं होय. सकाळचा सूर्य अनुभवणं, आईच्या हातच्या जेवणाची चव मनापासून घेणं, मित्रांसोबत मनमोकळं हसणं, स्वतःसाठी काही क्षण शांत बसणं... हे सगळं वर्तमानात जगण्याचं सौंदर्य आहे. जेव्हा माणूस छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिकतो तेव्हा त्याचं आयुष्य खर्या अर्थाने समृद्ध होतं.
काही लोक म्हणतात, “आयुष्यात खूप संघर्ष आहेत... मग आनंद कसा मिळणार?” पण खरं पाहिलं तर संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला असतात. शेतकरी उन्हात राबतो, कामगार दिवसभर मेहनत करतो, विद्यार्थी अभ्यासाचा ताण सहन करतो. तरीही अनेक साधी माणसं आनंदी दिसतात. कारण त्यांना वर्तमानात जगण्याची कला अवगत असते. त्यांच्याकडे मोठा पैसा नसतो पण मनात समाधान असतं. आणि समाधानापेक्षा मोठं सुख जगात दुसरं कोणतंच नाही.
माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे “योग्य वेळ” येण्याची वाट पाहणं. “हे झालं की आनंदी होईन”, “पैसा आला की जगीन”, “यश मिळालं की निवांत बसेन” असं म्हणता म्हणता आयुष्य निघून जातं. पण आनंद हा एखाद्या भविष्यातील घटनेत नसतो तो आपल्या विचारांत आणि वर्तमानात असतो. ज्याला आज हसायला येतं, तोच उद्याही आनंदी राहू शकतो.
वर्तमानात जगणारा माणूस अधिक मजबूत असतो. कारण तो प्रत्येक परिस्थिती स्विकारायला शिकतो. तो भूतकाळाच्या पश्चातापात अडकत नाही आणि भविष्याच्या भीतीने कोसळत नाही. त्याला माहिती असतं की आयुष्य बदलत राहतं. सुख कायम राहत नाही तसंच दुःखही कायम राहत नाही. म्हणूनच तो प्रत्येक क्षणाचं स्वागत करतो.
जीवनाचं खरं सौंदर्य साधेपणात आहे. मोठमोठ्या स्वप्नांइतकंच महत्त्व छोट्या क्षणांनाही आहे. एखाद्या संध्याकाळी शांतपणे आकाशाकडे पाहणं, पावसाच्या सरी अनुभवणं, कुटुंबासोबत चहा पिणं, जुन्या मित्राचा फोन येणं... हे क्षण आयुष्याला अर्थ देतात. पण हे अनुभवण्यासाठी मन वर्तमानात असणं आवश्यक आहे.
आज अनेक लोक मानसिक तणाव, नैराश्य आणि अस्वस्थतेने त्रस्त आहेत. त्यामागचं एक मोठं कारण म्हणजे वर्तमानापासून तुटलेलं जीवन. जेव्हा माणूस सतत तुलना करतो... इतरांच्या यशाकडे पाहून स्वतःला कमी समजतो... तेव्हा त्याचं समाधान नष्ट होतं. पण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. म्हणून दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या प्रवासाचा आनंद घेणं अधिक महत्त्वाचं आहे.
वर्तमानात जगणं म्हणजे निष्काळजीपणा नाही. उलट ते अधिक सजगपणे जगणं आहे. जो माणूस वर्तमानात असतो, तो आपल्या कामात अधिक लक्ष देतो, नात्यांना अधिक जपतो आणि स्वतःलाही अधिक समजून घेतो. तो प्रत्येक दिवसाला नवी संधी मानतो. कारण त्याला माहिती असतं की गेलेला वेळ परत येत नाही.
शेवटी, आयुष्य खूप छोटं आहे. कोणासाठी थांबत नाही. काल निघून गेला... उद्या अजून आलेला नाही... मग आपल्या हातात काय आहे? फक्त आज. आणि म्हणूनच आजचा दिवस मनापासून जगणं, प्रत्येक क्षणाची कदर करणं आणि स्वतःला आनंदी ठेवणं हेच खरं जीवन आहे.
भूतकाळातून अनुभव घ्या... भविष्याची स्वप्नं पाहा... पण वर्तमान विसरू नका. कारण जो वर्तमान जपतो तोच आयुष्य खर्या अर्थाने घडवतो. वर्तमानात जगणारा माणूसच खऱ्या अर्थाने जिवंत असतो.
डॉ.विजयकुमार एस.ठेंगेकर
निखिल नगर,यवतमाळ