संवाद हा नात्याचा पाया असतो
नातेसंबंध म्हणजे दोन व्यक्तींमधील बंधन. हे बंधन प्रेम, आपुलकी, जबाबदारी, अपेक्षा आणि समर्पण यावर उभं असतं. पण या सगळ्याच्या मुळाशी जर काही असेल, तर तो म्हणजे संवाद. संवाद हा नात्याचा पाया आहे. संवादाच्या अभावामुळे कित्येक सुंदर नाती विस्कटून जातात, तर संवाद योग्य पद्धतीने झाल्यास कोणत्याही अडचणींवर मात करता येते. कोणत्याही नात्यात विश्वास टिकवण्यासाठी आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी संवाद आवश्यक असतो.
जेव्हा पती व पत्नी ही माणसं प्रामाणिक आणि गंभीरपणे संवाद साधू शकतात, तेव्हा ते एकमेकांचे सर्वोत्तम मानसशास्त्रज्ञ ठरू शकतात. कारण मानसशास्त्र हे मन आणि वर्तन याचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. एका व्यक्तीला दुस-याच्या मनातील भावना, विचार, भीती, स्वप्नं आणि असुरक्षितता समजून घेणं गरजेचं असतं. हे समजून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आत्मपरीक्षण आणि संवेदनशीलता लागते. त्यासाठी खुलेपणाने आणि प्रामाणिकपणे संवाद साधण्याची तयारी असावी लागते.
कित्येक वेळा लोकं नातेसंबंधांच्या गुंतागुंतीबद्दल तक्रार करतात. “संबंध फार क्लिष्ट झालेत,” “तो मला समजून घेत नाही,” “ती कायम काही ना काही तक्रार करत असते.” अशा अनेक तक्रारी ऐकायला मिळतात. पण खरा प्रश्न हा असतो की, आपण एकमेकांशी स्पष्ट आणि मोकळेपणाने बोलतो का? एका नात्यात संवादाचा अर्थ फक्त बोलणे एवढाच नसतो तर ऐकणे, समजून घेणे, भावनांचा सन्मान करणे आणि उत्तरदायित्व स्वीकारणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. ब-याचदा आपण आपले मुद्दे मांडतो, पण समोरच्या व्यक्तीचे ऐकत नाही. हेच नात्यातील संघर्षाचे मूळ असते.
ज्यावेळेस नात्यांमधे संवाद कमी होतो, त्यावेळी दुरावा निर्माण होतो. समोरच्याला काय वाटते हे विचारण्याऐवजी आपण अंदाज लावतो. “तो बदलला आहे,” “ती आता पूर्वीसारखी वागत नाही.” अशा निष्कर्षांवर येतो. पण हे खरे आहे का? हे समजून घेण्यासाठी आपण मोकळेपणाने आणि विनासंकोच संवाद साधतो का? एकमेकांना वेळ न देणे, संवाद टाळणे, अपु-या माहितीवरून निष्कर्ष काढणे हे सर्व नात्यातील कटूता वाढवते. अनेकदा लोकं भांडण करताना आरोप-प्रत्यारोप करतात. पण जर दोघांनी शांतपणे एकमेकांचे म्हणणे ऐकले, तर हा दुरावा मिटू शकतो.
कधी कधी लोकं नात्यातील संवाद टाळतात कारण त्यांना वाटतं की, “जर मी खरं बोललो तर समोरचा दुखावला जाईल” किंवा “यावर चर्चा केल्याने काही उपयोग नाही.” पण हे चुकीचे आहे. नात्यात प्रामाणिकता हवी असेल, तर आपण आपल्या भावना व्यक्त करायला पाहिजे. आपल्याला काय हवे आहे, हे स्पष्ट सांगितलं पाहिजे. “मला तुझ्याकडून वेळ हवा आहे. माझ्या भावना समजून घेण्याची तुझी इच्छा आहे का? माझ्यासाठी काय महत्त्वाचे आहे, ते तुला सांगू इच्छितो.” आपण समोरच्याकडून काय अपेक्षा करता हे स्पष्ट सांगितलं पाहिजे. "मी तुझ्याकडून अधिक सहकार्याची अपेक्षा करतो. माझ्या निर्णयांचा आदर करावा, अशी माझी इच्छा आहे.” असं स्पष्ट बोलायला हवं.
आपल्या मनातील ख-या भावना लपवून न ठेवता बोललं पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीला काही त्रास होत असेल, पण ती ते बोलत नसेल तर समोरचा कसा समजून घेणार? अजून तरी मनातील ओळखणारे कुठलंही स्कॅनिंग अस्तित्वात आलं नाही. नात्यात अनेक समस्या असू शकतात. विश्वासघात, मतभेद, आर्थिक प्रश्न, मानसिक तणाव, कौटुंबिक जबाबदा-या इत्यादी. त्यातून कधीही परिस्थिती चिघळू शकते. भांडणाच्या वेळी किंवा तणावाखाली असताना संवाद करणे टाळलं, तर पुढे संवाद टिकून राहतो.
वैयक्तिक आयुष्यात पती-पत्नी दोघंही अनेकदा भांडतात. एक दोनदा पत्नी टोकाचा राग अनुभवतात. पण प्रत्येक वेळेस वाद झाला, भांडणं झालं तरी बोलणं टाकायचं नाही. भांडणाच्या वेळी विषय वेगळं वळण घेऊन कायमचा संवाद संपवू शकतो. त्यामुळे जेव्हा कधी वातावरण निवळेल तेव्हा शांततेत संवाद केल्यास तो अधिक प्रभावी ठरतो. विश्वास हा नात्याचा गाभा आहे आणि विश्वास दृढ करण्यासाठी प्रामाणिक संवाद आवश्यक असतो. जर तुम्ही नेहमी खरे बोलत असाल, समोरच्याची फसवणूक करत नसाल तर तुमच्या नात्यात एक वेगळाच घट्टपणा येतो. विश्वासघात झाल्यास संवाद हा तो दुरुस्त करण्याचा मार्ग असतो. कुणालाही पूर्णपणे समजून घेणे सहज शक्य नसते. पण संवादाच्या माध्यमातून त्या अंतरावर विजय मिळवता येतो.
नातेसंबंध टिकवण्यासाठी महागड्या भेटवस्तू, मोठ्या योजना किंवा अविश्रांत प्रयत्न करण्याची गरज नसते. गरज असते ती फक्त प्रामाणिक आणि खुले संभाषण करण्याची. त्यामुळे कितीही वादविवाद झाले तरी संवाद शक्य तितका जोडून ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा संवाद योग्यरित्या होतो, तेव्हा कोणताही वाद मिटू शकतो. नातं टिकू शकतं, फुलू शकतं आणि अधिक सशक्त बनू शकतं. त्यामुळे संवादाला पर्याय नाही. यासाठी बोलत रहा, हसत रहा आणि नातं जपत रहा.
शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९
