उलवे नोडमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
अलिबाग (वार्ताहर )
उलवे नोड येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. परिसर शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला होता.
माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी खारकोपर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना अटल सेतू परिसरात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी भूखंड न दिल्यास सिडको व संबंधित आमदारांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला.
सिडकोकडून पाच कोटी रुपयांची मागणी होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणे ही आपली अस्मिता असल्याचे सांगत १ रुपया दराने भूखंड देण्याची मागणी केली. “शिवराय हे जगाचे मॅनेजमेंट गुरू असून त्यांचा संपूर्ण जगाला सार्थ अभिमान आहे .
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवरायांची युद्धकला सादर केली. आरोही राळे, स्वरा सुतार, सिद्दिका शेख व आयुषी सोनटक्के यांनी शिवचरित्र सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण वातावरण राष्ट्राभिमानाने भारलेले होते.
