...मना सज्जना..
पक्या, बंड्या, शेलार आणि सरपंचांचा रघ्या ही रिकामटेकडी चौकडी कट्ट्यावर बसून खलबत् करीत होती. रघ्यानी दिवे पाजळले, "हे बघा मागच्या वारीला डबोल नाही घावलं या टायमाला रस्ता बदलूया. ज्ञानबा तुकाराम पालखी निघते ना तिथं हडपसरला जायचं आपण. गर्दीचा पूर असतो तिथं. आपण त्यात हात धुवून घ्यायचे. वेंधळ्या बायकांना सहज गंडवता येतं, आपण जास्तीन जास्त माल हडप करायचा. आठ हात हातावर पडले आणि 'साळसूद मनसुबा' पक्का झाला. योग्य वेळी मंडळी पांढरा पोशाख,तुळशी माळ आणि पताका घेऊन हडपसरच्या गर्दीतं मिसळली. चोरीची पहिली बोहिनी केली एका आजीने."हे बघ बाळा ह्यो मोबाईल घे अन् माज्या नातीला फोन लावून दे,लहान हाय लेकरू चुकामुक झालीया आमची." असं म्हणत ईश्वासाने म्हातारीने मोबाईलचं डबडं मध्याच्या हातात दिलं. अरेच्या! आहेतच क घबाड मिळालं की," मध्या खुशीने हंसला म्हातारीला ओट्यावर बसवताना त्यानं बजावलं, "हे बघ अ जे हितन हलू नको हीतच थांब मी शोधून आणतो तुझ्या नातीला," "आरपण फोन लाव की आदी तिक डं कुट निघालास?"आजी घाबरी झाली. अरेच्या! रिंग वाजतीय विश्वास ठेव माझ्यावर म्हातारे या गदारोळात काही कळंना झालया थांब कडेला होऊन म्याच बोलतोया तुझ्या नातीसंग असं पुटपुटतच आजीच्या होकारा नकाराची वाट न पाहता मध्याने पळ काढला. चला पहिलं काम फत्ते झालं. खुशीने शीळ घातली त्यानी. जवळपास घिरट्या घालणाऱ्या पक्याला तो संदेश मिळाला. त्याची पण कळी खुललेली होती कारण पहिली बोहणी होऊन एका आजोबांच्या खिशातली डबी त्याने लाटली होती. आसपास फिरणाऱ्या बंड्याला पण भारी सावध सापडलं होतं आता गबाडं मिळवून बंड्या पण त्यांच्यात मिसळला आता राहता राह्यला शेलार, तो आला की चोरीच्या मालाची वाटणी करायची एवढंच काम बाकी होतं. डबीत सोन्याचं गंठण होतं. चौघांचं काळीज लकाकलं आणि डोळे चमकले. आणखी काही मिळते का म्हणून शेलार गर्दीत मिसळला पाराखाली डोळे पुसत असलेले आजोबा त्याला दिसले. का कोण जाणे त्याला त्यांची दया आली. त्यांच्या पाठीवर हात ठेवून तो म्हणाला," बाबा काही होतंय का तुम्हाला? मी काही मदत करू का? प्रश्न प्रश्ना सरशी आजोबा उसळून म्हणाले, " डाव साधलारं त्यानं, टाळ मृदंग घेऊन नाचत असताना तुझ्यासारख्या मुलाने माझ्या खिशातले डबी लांबवली रे माझे हात टाळ वाजवण्यात अडकले होते हे बघून त्यानी हात मारला ओरडे पर्यंत पळाला पण तो पोरगा, चेहरा पाहायलाय मी त्याचा." अरे बापरे! म्हणजे पोलिसात तक्रार केली आजोबांनी तर पक्या सहज जाळ्यात अडकेल,हा विचार दाबून शेलार म्हणाला, "मला एक सांगा गंठण सोन्याचं होतं का आजोबा?" उदवेगाने आजोबा उत्तरले. आरं बाबा एक वेळ सोन्याचं गेलं असतं तरी चाललं असतं रे, सोन्यापेक्षा लय लय मोलाच व्हतं ते डोरलं. " शेलारला कोडं उलगडना सोन्याचं नाही मग अत्यंत मोलाचं असं कसं काय? आजोबांना शांत करून तो म्हणाला, " नीट कळल असं सांगा की जरा. सोन्याचं नसेल तर मग ते तुम्हाला परत मिळवून देईन हो ना! तसल्या चोरीचा चोराला काय उपयोग? शेलारनी मनाशी हिशोब केला. "अरं बाबा ते माझ्या माय माऊली रखुमाईच्या गळ्यातलं सौभाग्य लेणं व्हतं अशी खूप जमलेली रखु माय माऊली ची सवाष्ण लेणी मग भाग्यवान भक्तांना देतात. माझी कारभारीण आहे दरवेळी पहिलं डोरलं काढून त्या माय माऊलीच्या पायाशी ठेवते आणि नव तिच्या गळ्यातलं प्रसाद म्हणून स्वतःच्या गळ्यात घालत. आमचा हा नेम कधीच चुकला नाही.मध्यंतरी मी खूप आजारी पडलो अगदी यमाच्या दारातून परत आलो कारभारणीनं रखुमाईचं गंठण मिळवलं घातलं आणि माझं आयुष्य वाढलं.तेव्हापासून आमची ही वारी हा क्रम चुकला नाही.,"मग बाबा तुमची कारभारीण कुठे आहे,? शेलारला हे सगळं नवीन होतं. आजीच्या श्रद्धेनी तोही भारावला. बोट दाखवून आजोबा म्हणाले,"ती बघ तिकडं रडत बसलीय म्हणतीया,"रखुमाईचं सौभाग्य मणी आमच्या हातून हरवलंया, हा अपशकुन झालाया म्या आता माऊलीला काय सांगू? कस तोंड दाखवू? म्हातारी हुंदके देऊन देऊन रडत होती. शेलार गरकनगर्रकन वळून म्हणाला, बाबा कारभारणीला शांत करा. प्रत्यक्ष माय माऊली रखुमाईच्या सौभाग्य लेण्याची झालेली चोरी मी तुम्हाला परत मिळवून देईनं. बरं इथेच थांबा मी आलोच," शेलार तीरासारखा धावला. आता तो चोर नव्हता तर सत्संगतीमुळे झालेला सज्जन होता. त्यानी मित्रांना सारं काही सांगून समजावलं. श्रद्धेचा हा धागा आपण जोडूया आणि चोरीची कांस सोडूया, कष्ट करू आपण,वाकड्या वाटेने न जाता प्रामाणिकपणाची आंस धरूया. मित्रांनो कशाला हवाय हा चोरीचा मालाचा हंव्यास? ठरलं तर मग पंढरीची वारी करणाऱ्या या देवत्वांना आपण आता यापुढे खूप खूप मदतच करायची. " आणि मग काय सांगु! मित्रमंडळींनी सत्संगात स्वतःला झोकून दिलं. ह्या सेवाभावी साधकांनी मग कुणाचा मोबाईल चार्जिंग करून दे, कोणाच्या हातापायाला तेल लावून दे,कुणाला अन्न वाटप कर, तर कुणाला औषध पाणी अशी मनापासून मदत करायला सुरुवात केली. अजूनही तुम्ही तिथे जाल तर हडपसरच्या आसपास मदतीसाठी दिवस रात्र राबणारी धावाधाव करणारी ही चौकडी तुम्हाला दरवर्षी दिसेल. चोरीसारखं कुकर्म करण्यासाठी आलेल्या या तरुणांचं आयुष्यच या रखुमाईन आणि ज्ञानबा तुकारामच्या पालखी भेटीच्या संगमानी पार पार बदलून गेलं अगदी आरपार बदललं साध निरांजन नंदादीप होतं. तसं सज्जनांच्या संगतीमुळे मुलांच्या जीवाच्या 'शिव' झाला होता. वाकड्या वळणावरून ते सन्मार्गी लागले होते आणि आता हे चौघांचं वारकरी सेवेला वाहून घेतलेलं मंडळ पुढच्या वारीला इतर मित्रांपैकी कुणाकुणाला या सेवा मंडळात ओढून घ्यायचं या विचाराने पुढच्या वर्षीच्या वारीची वाट बघत आहेत. बोला .. खुमाईच्या वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा... विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
लेखिका =राधिका (माजगावकर) पंडीत. पुणे
