“निवडणूक केंद्रातच नियमभंग”; तटकरे यांची गोगावले गटावर थेट टीका — “एकेरी भाषेत बोलून महाराष्ट्राला दर्शन घडवले”; तटकरे यांची कडवी टीका
रायगड - अमुलकुमार जैन
महाड शहरात निवडणूक प्रक्रियेदरम्यान उद्भवलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या पुत्रासह त्यांच्या साथीदारांवर गंभीर आरोप केले. तटकरे यांनी कठोर शब्दांत टीका करत सांगितले की, “निवडणूक केंद्रातच नियमभंग करण्यात आला असून गोगावले गटाने एकेरी भाषेत बोलून संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडवले.”
घटनेचा निषेध करत तटकरे म्हणाले की, सकाळपासूनच विकास गोगावले व त्यांचे समर्थक महाड शहरात फिरत होते. त्यांनी मतदान केंद्रात जाऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी वाद घातला. “निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदान केंद्रात केवळ उमेदवार किंवा त्यांचे पोलिंग एजंटच जाऊ शकतात. तरीसुद्धा गोगावले गटाने सरळ नियमभंग केला,” असे तटकरे म्हणाले.
दरम्यान त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप राजकीय हेतुपुरस्सर असल्याचे सांगत त्यांनी सडेतोड उत्तर दिले. “माझा या प्रकरणाशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. स्वतः कृत्य करायचे आणि आरोप दुसऱ्यावर टाकायचे हा धंदा त्यांनी आयुष्यभर केला आहे,” असा तडकाफडकी टोला त्यांनी लगावला. पुढे बोलताना तटकरे म्हणाले, “माझे वय एकाहत्तर आहे; तरीही माझ्याविरोधात एकेरी भाषेत बोलून केवळ राजकीय वैमनस्यातून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
तटकरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी रायगड पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे केली आहे. “ज्यांनी नियमभंग केला, ज्यांनी हिंसाचाराला प्रोत्साहन दिले, ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. तसेच ज्यांचा ‘इतिहास’ आहे, त्यांची पार्श्वभूमीही तपासावी,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी पोलिसांना दिले.
महाडमधील हा प्रकार केवळ स्थानिक नव्हे तर राज्यभरात चर्चेचा विषय ठरला असून दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. तटकरे यांच्या कठोर प्रतिक्रियेमुळे या प्रकरणाला आणखी नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
