तब्बल ९९ वेळा रक्तदान करून मानवतेचा आदर्श निर्माण — समाजसेवक संदेश बेडेकर यांना सलाम!
‘स्पाईस रेस्टॉरंट’चा सामाजिक उपक्रम ठरला प्रेरणादायी — चवीसोबतच मानवतेचं समाधान देणारा उपक्रम
अलिबाग (ओमकार नागावकर)
: “रक्तदान श्रेष्ठदान” या संदेशाला साजेसं उदाहरण म्हणजे चौल-रेवदंडा बायपास रोडवरील स्पाईस रेस्टॉरंट. स्वादिष्ट जेवणाची चव आणि सामाजिक जाण यांचा अनोखा संगम घडवत, स्पाईस रेस्टॉरंट तर्फे “एक पाऊल समाजासाठी” या उपक्रमांतर्गत दि. ४ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात तब्बल ९९ वेळा रक्तदान करून मानवतेचा इतिहास घडविणारे समाजसेवक संदेश बेडेकर यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या निःस्वार्थी सेवाभावाला उपस्थित मान्यवरांनी सलाम केला.
स्पाईस रेस्टॉरंटचे मालक केदार मळेकर हे फक्त उत्तम खाद्यसंस्कृतीचे संवाहक नाहीत, तर समाजमन जपणारे संवेदनशील उद्योजकही आहेत. गेली चार वर्षे त्यांनी चौल-रेवदंडा पंचक्रोशीत “एक पाऊल समाजासाठी” या उपक्रमातून मानवतेचे तेज पसरवले आहे.
शिबिराचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी चौल ग्रामपंचायत उपसरपंच अजित गुरव, विभागप्रमुख मारुती भगत, उपविभागप्रमुख शैलेश घरत, शाखाप्रमुख अशोक नाईक, दिपेश पाटील, डॉ. समीर धाटावकर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ.दिपक गोसावी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
जिल्हाप्रमुख म्हात्रे म्हणाले,
“रक्तदान ही केवळ जबाबदारी नाही, ती मानवतेची भावना आहे. स्पाईस रेस्टॉरंटसारख्या सामाजिक दृष्टिकोन असलेल्या उपक्रमांमुळे समाजात संवेदना जिवंत राहतात.”
या उपक्रमामागील प्रेरणा सांगताना आयोजक केदार मळेकर म्हणाले,
“अन्न देणं ही तृप्तीची भावना आहे, पण रक्तदान म्हणजे जीवदान — म्हणूनच ‘स्पाईस रेस्टॉरंट’ केवळ चवीचा नाही, तर मानवतेचा सुगंधही पसरवत आहे.”
समाजात रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा हा प्रयत्न ठरला आहे. स्वादाच्या माध्यमातून समाजसेवेचा संदेश देणारे स्पाईस रेस्टॉरंट खऱ्या अर्थाने “स्वाद आणि सद्भावनेचा संगम” ठरले आहे.
