हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा — हजरत पीर शेहेनशा वली उरूस उत्सव जल्लोषात साजरा!
रेवदंड्यात धर्मसौहार्दाचा अनोखा संगम; भक्तिमय वातावरणात कव्वालीने रंगली मैफल
अलिबाग (प्रतिनिधी – ओमकार नागावकर):
रेवदंड्यातील हजरत पीर शेहेनशा वली यांच्या पवित्र दर्ग्यात बुधवार (दि. ५ नोव्हेंबर) पारंपरिक उरूस उत्सव भक्ती, आनंद आणि सौहार्दाच्या वातावरणात जल्लोषात साजरा झाला. तब्बल १५० वर्षांपासून अविरत सुरू असलेली ही धार्मिक परंपरा आजही तितक्याच श्रद्धा, उत्साह आणि एकतेच्या भावनेने उजळून निघत आहे.
या उत्सवाचे अध्यक्ष आसिफ गोंडेकर यांनी आपल्या मित्रमंडळासह उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रमाचे सुरळीत आयोजन केले. या प्रसंगी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन दर्ग्यात चादर अर्पण करत धर्मसौहार्द, ऐक्य आणि बंधुत्वाचा संदेश दिला.
संध्याकाळी पारंपरिक संदल मिरवणूक आणि चादर चढविण्याचा सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. त्यानंतर रंगलेल्या कव्वालीच्या मैफलीने वातावरण अधिकच आध्यात्मिक आणि सुरेल बनले. उपस्थितांनी तालावर टाळ्या वाजवत या भक्तिमय संगीताचा आस्वाद घेतला.
उत्सवाचे समन्वय आणि व्यवस्थापन आसिफ गोंडेकर आणि मित्रमंडळाने अत्यंत यशस्वीपणे पार पाडले. कार्यक्रमाच्या यशात इक्बाल फटाकरे, सलीम गोंडेकर, हानिफ गोंडेकर, मुजफ्फर मुकादम, सलीम तांडेल, सुहास घोणे, राहुल गणपत, सुजय घरत, दिपक वैद्य, प्रथमेश कोळसेकर, सचिन पवार आदींचा मोलाचा सहभाग होता.
या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य वामन चुनेकर, चौल ग्रामपंचायत उपसरपंच अजित गुरव, शाखाप्रमुख राजेंद्र गुरव, सदस्य राजेंद्र वाडकर, संदिप खोत, निलेश खोत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उरूस उत्सवाच्या निमित्ताने रेवदंड्यात धर्मनिरपेक्षतेचा आणि सामाजिक ऐक्याचा उज्ज्वल संदेश पुन्हा एकदा झळाळून दिसला. श्रद्धा, संस्कृती आणि सामंजस्य यांचा सुंदर मिलाफ घडवणारा हा उत्सव, रेवदंड्याच्या धार्मिक परंपरेचा आणि समाजबंधुतेचा अभिमानास्पद सोहळा ठरला.
