Home

ताडवागळे येथे भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षांना कार्यकर्त्यांचा 'धनुष्य' असा अनोखा वाढदिवस भेट


 ताडवागळे येथे भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षांना कार्यकर्त्यांचा 'धनुष्य' असा अनोखा वाढदिवस भेट

रायगड - अमुलकुमार जैन 

ताडवागळे (रायगड) येथे भारतीय जनता पक्षाच्या रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती चित्रा आस्वाद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनपेक्षित राजकीय नाट्यमय घटनाक्रम पाहायला मिळाला. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी अचानक भाजपचा ‘कमळ’ चिन्ह हातातून सोडून शिवसेनेचे ‘धनुष्य’ हाती घेत प्रवेश केला. या घटनेमुळे स्थानिक राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून शेकापमध्ये कार्यरत असलेले आणि काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये दाखल झालेले काही पदाधिकारी कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नव्याने शिवसेनेत गेलेल्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. त्यांच्या म्हणण्यानुसार, पक्षातील काही नेते स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कार्यकर्त्यांना बाजूला ठेवत असल्याने असंतोष वाढत होता. या पार्श्वभूमीवरच त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.


दरम्यान, रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, पेण आणि रोहा नगरपरिषद निवडणुका जवळ आल्याने पक्षांतरांचे प्रमाण वाढले आहे. आमदार महेंद्र दळवी या निवडणुकांवर विशेष मेहनत घेत आहेत. मात्र स्थानिक स्तरावर काही गटांत मतभेद तीव्र झाले असून दत्ता पाटील व प्रभाकर पाटील यांनी केलेल्या कामाचा उपयोग काही व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी घेत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.


या कार्यक्रमात मीनाक्षी पाटील, सिद्धेश वामन हंबीर, प्रतीक प्रकाश आरिलकर तसेच त्यांचे समर्थक यांनी शिवसेनेत प्रवेश केला. धनुष्य हातात घेत त्यांनी शिवसेनेत प्रवेश करताच उपस्थितांमध्ये आश्चर्य आणि चर्चा रंगली.


चित्रा पाटील यांच्या वाढदिवशी घडलेल्या या प्रवेशामुळे भाजपा आणि शिवसेनेच्या स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बदलाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post Next Post