शेकाप–भाजपच्या दुर्लक्षाला शिवसेनेचे उत्तर; श्रीगावचा रस्ता झाला सुकर
अलिबाग (प्रतिनिधी)
श्रीगाव ग्रामस्थांना अनेक वर्षे खड्डेमय रस्त्याचा सामना करावा लागत होता. “शेकाप–भाजपच्या दुर्लक्षाला शिवसेनेचे उत्तर; श्रीगावचा रस्ता झाला सुकर” या घोषणेसह शिंदे गटाच्या शिवसेनेने या प्रलंबित प्रश्नावर अखेर ठोस पावले उचलली आहेत. पक्ष विरहित काम करणारी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेने ग्रामस्थांची दीर्घकाळची मागणी पूर्ण करत रस्त्याचे खडीकरण पूर्ण केले असून लवकरच डांबरीकरण करण्याची हमी दिली आहे.
अनेक वर्षे श्रीगाव ग्रामपंचायतीवर शेकापची सत्ता असूनही या रस्त्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही, अशी ग्रामस्थांची नाराजी होती. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी आरोप केला की, “शेकाप आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ खोटी बिले काढण्याचे काम केले, विकास मात्र झाला नाही. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत.” त्यांनी सांगितले की, आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास झाला असून श्रीगावचा रस्ता हा त्याचाच एक भाग आहे.
ग्रामस्थांना दररोज खड्डे, चिखल आणि असुरक्षित मार्गातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. विद्यार्थ्यांना शाळेत जाणे, नागरिकांना रुग्णालयात पोहोचणे, महिलांना दैनंदिन कामांसाठी बाहेर जाणे — हे सर्व अत्यंत कठीण बनले होते. त्यामुळे रस्ता दुरुस्तीची कामे सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमावेळी कुर्डुस जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार रसिका राजा केणी, आंबेपूर गणाचे उमेदवार शैलेश पाटील, जीवन पाटील तसेच श्रीगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेच्या पुढाकारामुळे आता श्रीगावचा रस्ता केवळ सुकरच नव्हे तर सुरक्षितही होणार असल्याचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
.jpg)