श्री संत ज्ञानेश्वर माऊली
भागवत धर्म । संतांस भावला ।
पाया तो रचिला । ज्ञानदेवे ।।
विठ्ठलपंत नि । रुक्मिणीबाईंचे ।
कुलकर्णी यांचे । पुत्र ज्ञाना ।।
गोदावरी काठी । पैठण सुभ्यात ।
त्या आपेगावात । जन्मे ज्ञाना ।।
मुक्ताबाई आणि । निवृत्ती सोपान ।
भावंडे ती तीन । ज्ञानेशांची ।।
संन्याशाचे पोर । टिकाही साहिले ।
संयमी राहिले । संत ज्ञाना ।।
मात्यपित्यापाठी । वडील भावाचा ।
निवृत्तीनाथांचा । शिष्य ज्ञाना ।।
गुरूच्या आज्ञेने । ज्ञाना देई लोकां ।
भावार्थ दीपिका । ज्ञानेश्वरी ।।
अध्यात्म आणिक । तत्त्वज्ञानावर ।
सांगती विचार । लोकां ज्ञाना ।।
सहज सुलभ । भाषा मराठीची
असे साहित्याची । ज्ञानेशांच्या ।।
ज्ञानेश्वरी जैसे । वाङ्मयाचे लेणे ।
अनमोल देणे । देई ज्ञाना ।।
सोळाव्या वर्षीच । जना उपदेश ।
राही वर्षोवर्ष । ज्ञानेशांचा ।।
पसायदानाने । सांगता ग्रंथाची ।
काळजी विश्वाची । वाही ज्ञाना ।।
विठुनामासह । भक्त संप्रदायी ।
जयघोष होई । ज्ञानीयाचा ।।
तयांची समाधी । आळंदी नगरी ।
येती वारकरी । ज्ञाना भेटी ।।
श्री.प्रविण शांताराम म्हात्रे
(पनवेल )
