अलिबाग नगरपरिषद निवडणूक शेकाप, काँग्रेस आघाडी उमेदवारांनी केले उमेदवारी अर्ज दाखल...
अलिबाग (प्रतिनिधी)
अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी शनिवारी (दि.१५) वाजतगाजत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष पदासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या अक्षया नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
शनिवारी शेकाप, काँग्रेस आघाडीचे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आल्याने शेतकरी भवन येथे शेकडो शेकाप कार्यकर्ते जमा झाले होते. शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस आघाडीचे सर्व उमेदवार शेतकरी भवन येथे १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान शेतकरी भवनात दाखल झाले. यांनतर शेकाप सरचिटणीस जयंत पाटील व पक्षाच्या इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शेतकरी भवन येथे जात उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
११.३० दरम्यान शेतकरी भवन येथून सर्व उमेदवार अलिबाग नगरपरिषदेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहचले. यांनतर सर्वप्रथम नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम पाटील यांच्याकडे दाखल केला. यांनतर सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे, काँग्रेसचे समीर ठाकूर या दिग्गज उमेदवारांचा समावेश आहे. यावेळी काँग्रेसचे नेते राजाभाऊ ठाकूर, काका ठाकूर, सुनील थळे उपस्थित होते.
