अलिबाग नगरपरिषद : प्रभाग ४ मध्ये तिरंगी मुकाबल्याची चिन्हे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दमदार शक्तिप्रदर्शन
अलिबाग : अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मध्ये तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होत असून, शेकाप–काँग्रेसची आघाडी आणि भाजपा-शिवसेना (शिंदे गट) यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दमदार तयारी दाखवली आहे. शहरप्रमुख संदीप पालकर आणि श्वेता पालकर यांनी सोमवारी (दि.१७) मोठ्या उत्साहात आपली नामनिर्देशनपत्रे दाखल करत रणशिंग फुंकले.
२ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशनाचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची दवंडी सुरू होती. याच दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम पाटील यांच्या समक्ष दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले. अर्ज दाखल करताना शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा सल्लागार सतीश पाटील, अलिबाग तालुका प्रमुख शंकर गुरव, मुरुड तालुकाप्रमुख नौशाद दळवी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
“विकास हा आमचा मुख्य मुद्दा” — संदीप पालकर
“प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मागील काही वर्षांत आम्ही अनेक कामे हाती घेतली. पुढील काळातही जनतेच्या गरजांनुसार आवश्यक त्या सुविधा प्राधान्याने उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रभागातील मतदारांचा विश्वास व पाठिंबा आमच्याबरोबर असून, यावेळीही आम्हाला विजयी करणार याची मला खात्री आहे,” अशी भावना उमेदवार संदीप पालकर यांनी व्यक्त केली.
“मतदारांचे प्रेम आणि विश्वास आमच्या उमेदवारांसोबत” — सुरेंद्र म्हात्रे
जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे म्हणाले, “संदीप आणि श्वेता पालकर यांनी पाच वर्षांपासून प्रभागात सातत्याने विकासकामे पूर्ण केली. त्याचा थेट फायदा नागरिकांना झाला असून मतदार त्यांच्याकडे स्पष्टपणे समर्थन दर्शवत आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक ४ मधील दोन्ही उमेदवारांचे विजय निश्चित आहे.”
