रेवदंड्यातील पारंपरिक कुस्त्यांवर पावसाचे सावट; ऐन दिवाळीतही थरार कायम
७० वर्षांच्या परंपरेत पहिल्यांदाच लक्ष्मीपूजनाच्या कुस्त्यांना धो-धो पावसाने दिलं आव्हान
रेवदंडा (ओमकार नागावकर) :
रेवदंडा परिसरातील ७० वर्षांची अखंड परंपरा असलेला लक्ष्मीपूजन निमित्ताचा जंगी कुस्ती सोहळा यंदा अनपेक्षित पावसाच्या सरींनी भिजवला, तरीही मल्लांचा उत्साह आणि प्रेक्षकांचा जल्लोष मात्र ओसंडून वाहत होता. पावसाचा अडथळा क्षणभरही मनोबल डळमळू देणारा ठरला नाही — उलट वातावरणात नवचैतन्य निर्माण झालं.
श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळ, चौल–रेवदंडा यांच्या वतीने आयोजित या पारंपरिक स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या हस्ते पार पडले. रेवदंडा हायस्कूलच्या पटांगणावर दि. २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता रंगलेल्या या कुस्ती सोहळ्यात परिसरातील नामांकित आखाड्यांतील मल्लांनी आपल्या दमदार खेळी आणि झुंझार वृत्तीने प्रेक्षकांची मने जिंकली. नारळावर घेतलेल्या प्रत्येक झुंजीत कौशल्य, सामर्थ्य आणि कणखर जिद्दीचा उत्कृष्ट मिलाफ पाहायला मिळाला.
या पारंपरिक स्पर्धेचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष सुरेश खोत, खजिनदार शरद वरसोलकर आणि चिटणीस हेमंत गणपत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटनेचे सदस्य जयेंद्र घरत, शेकाप चौलचे चिटणीस अरविंद शिवळकर, रवींद्र घासे, प्रमोद भगत, विलास पाटील, संदीप खोत (मा. ग्राम. सदस्य रेवदंडा), विजय चौलकर, खालील तांडेल (ग्राम. सदस्य), रेवदंडा शहर चिटणीस निलेश खोत, प्रमोद नवखारकर, एस. पी. ठाकूर, राहुल गणपत, चंद्रकांत धाटावकर, महेश ठाकूर, निवेदक राजेंद्र नाईक, मधुकर फुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
“पारंपरिक खेळ हीच आपली खरी संस्कृती आहे, आणि ती जपणे हे आपले कर्तव्य आहे,” असा प्रभावी संदेश सुरेंद्र म्हात्रे यांनी उद्घाटनप्रसंगी दिला.
पावसाच्या जोरदार सरींनी खेळ थोडा विस्कळीत झाला असला तरी निर्णायक सामन्यांनंतर मंडळाच्या निर्णयानुसार ‘जय हनुमान वाडगाव’ यांनी प्रथम, ‘बेलोशी’ यांनी द्वितीय, तर ‘पिसारवे (पनवेल)’ यांनी तृतीय क्रमांक पटकावला. “पावसात भिजूनही परंपरेचा मान राखणारे हे मल्लच ग्रामीण महाराष्ट्राचा खरा अभिमान आहेत,” अशा शब्दांत आयोजकांनी समाधान व्यक्त केले.