Home

ध्रुव जुरेलचं पहिलं वादळी शतक; बॅटला बनवले रायफल, मग सैन्याला कडक सॅल्यूट; सेलिब्रेशननं जिंकलं भारतीयांचं मन


 

ध्रुव जुरेलचं पहिलं वादळी शतक; बॅटला बनवले रायफल, मग सैन्याला कडक सॅल्यूट; सेलिब्रेशननं जिंकलं भारतीयांचं मन

अहमदाबाद(प्रतिनिधी )

पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा युवा फलंदाज ध्रुव जुरेल चमकला आहे. पाचव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या जुरेलने वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. शतकानंतर त्याचे सेलिब्रेशन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. जुरेलने आपली बॅट रायफलसारखी खांद्यावर धरली आणि आर्मी कडक सॅल्यूट दिला. त्याचे वडील कारगिल युद्धातील शूरवीर सैनिक असल्यामुळे त्याचा कल लहानपणापासूनच सेनेकडे आहे. त्यामुळे त्याचा हा अंदाज चाहत्यांच्या मनाला भावला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जुरेलने 210 चेंडूंमध्ये 125 धावांची खेळी खेळली. त्याच्या या डावात 15 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. सुरुवातीला संयमाने खेळ करणारा जुरेल नंतर विंडीज गोलंदाजांच्या खराब चेंडूंवर जोरदार फटकेबाजी करताना दिसला. याआधी के. एल. राहुलनेही शतक झळकावले होते. तो 100 धावांवर बाद झाला. इतकेच नाही तर, जुरेल वेस्ट इंडिजविरुद्ध पहिले कसोटी शतक करणारा पाचवा भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ठरला. त्याच्या आधी विजय मांजरेकर, फारुख इंजिनिअर, अजय रात्रा आणि वृद्धिमान साहा यांनी कॅरेबियनविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावले होते. आता जुरेलचाही या यादीत समावेश झाला आहे. 

जुरेलने 125 धावांची शानदार खेळी खेळून अखेर पॅव्हेलियनमध्ये परतला. योगायोगाने, त्याला डावखुरा फिरकी गोलंदाज खारी पियरने बाद केले, जो 34 व्या वर्षी कसोटी पदार्पण करत होता आणि जुरेल त्याचा पहिला बळी ठरला. ऋषभ पंत इंग्लंड दौऱ्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध तो खेळणार नव्हता, त्यामुळे भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली होती. प्रश्न होता की, पंतच्या जागी कोण खेळणार? संघात पर्याय उपलब्ध होते, पण पंतसारखी आक्रमक फलंदाजी करणं सोपं नव्हतं. अशा वेळी ध्रुव जुरेलचे नाव पुढे आले. जुरेल हा पंतसारखाच धाडसी खेळाडू आहे आणि त्याने आपल्या खेळातून दाखवून दिलं की तो कसोटीत मोठी खेळी करण्याची ताकद ठेवतो

Previous Post Next Post