राज्यावर पावसाचे संकट कायम; मुंबई, ठाण्यासह पालघरला आज रेड अलर्ट जारी
मुंबई(वार्ताहर)
दोन दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. आजही राज्यात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धाराशिव, बीडसह मराठवाड्यातील काही भागात सध्या पूरस्थिती परिस्थिती कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाण्यासह पालघरला रेड अलर्ट देण्यात आलाय, तर संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, असा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाने जोर धरला आहे. पुढील ४८ तास राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आलाय. तर उर्वरित राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संभाजीनगर, जालना, बीड, परभणीमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि पालघरमध्येही पहाटेपासून पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मराठवाड्यात पावसामुळे शेताला तळ्याचे रूप आले आहे. अचानक आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या घराला वेडा पडला आहे. घरामध्ये पाणी शिरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागातील ओढे नाल्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले असून रस्त्यावरूनही मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे.
मुंबई, ठाणे, पालघरसह ५ जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे पावसाचा जोर वाढलेला दिसत आहे. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सध्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक आणि पुणे घाट माथ्यावर अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्यरात्रीपासून उपनगरांत पावसाला सुरुवात झाली असली तरी लोकल आणि रस्ते वाहतूक सध्या सुरळीत आहे. मात्र दुपारनंतर अतिवृष्टी झाल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे, जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले असून डोंगरी आणि तितुर नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. काढणीवर आलेल्या शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. धाराशिव जिल्ह्यातही तेरणा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावध राहण्याचा इशारा दिला आहे. पुण्याला यलो अलर्ट असला तरी घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे.