गृहलक्ष्मी
मीच दुर्गा महालक्ष्मी
मीच आहे गौरी
आनंदाचा झरा वाहतो
माझ्यामुळे घरोघरी
मी असते आनंदी
तेव्हा घर माझे हसते
प्रसन्नतेच शुभ्र चांदणे
घरात माझ्या फुलते
दारी सजते रांगोळी अन्
तुळशीपाशी दिवा
सुसज्ज घरासाठी माझा
हात फिरता सदा हवा
सणावारी पक्वांन्नांचा
दरवळ घुमतो गावगढी
संस्काराचे कुंपण बघुनी
सक्षम बनते पुढील पिढी
सहनशीलता अगम्य शक्ती
बहाल केली गृहलक्ष्मीला
नमन करावे मनापासुनी
घरोघरीच्या जगदंबेला
प्रा.मानसी जोशी