अलिबाग–वडखळ महामार्ग खड्डेमय; संतप्त नागरिकांचा इशारा – “दुरुस्ती नाही तर रस्ता रोको आंदोलन अटळ”
अलिबाग (ओमकार नागावकर) :
अलिबाग–वडखळ (राष्ट्रीय महामार्ग क्र.१६६) हा रस्ता अक्षरशः खड्डेमय झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लाखो खड्डे, धोकादायक वळणे, उंचसखल रस्ते आणि असंख्य जंप्स यामुळे या महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीवावर बेतणारे ठरत आहे. हा रस्ता मानवी वापरास अयोग्य असून फक्त गुरे–ढोरे आणि बैलगाडीसाठीच योग्य आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
सदर महामार्गावरील पिंपळभाट, राऊतवाडी–वाडगांव फाटा, खंडाळा–तळवली, मैनूशेटचा वाडा, तीनवीरा गेस्ट हाऊस–जोशी वडेवाले–चरी फाटा, पेझारी पोलीस चौकी–पोयनाड पांडबादेवी या ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असून, दररोज हजारो प्रवाशांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
अर्जदार निलेश शरद पाटील यांनी दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, “राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा मार्ग (क्र.१६६) आपल्या ताब्यात घेतल्यानंतरही अद्याप दुरुस्तीचे काम केले गेले नाही. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून प्रवाशांचा जीव धोक्यात आहे. करदात्या नागरिकांना हा रस्ता खड्डेमुक्त करून सुयोग्य स्थितीत मिळावा, ही आमची ठाम मागणी आहे. अन्यथा आम्हाला रस्ता रोकोसारखे कठोर आंदोलन करावे लागेल.”
या निवेदनावर कारवाई न झाल्यास नागरिकांकडून सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
्या आंदोलनात मा.नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अँड.मानसी म्हात्रे, अँड.प्रवीण ठाकूर, निलेश दादा पाटील, दिलीप जोग, सुरेश घरत, शैलेश चव्हाण, सचिन राऊळ, आकाश राणे, निखिल मयेकर, विक्रांत वार्ड, विकास पिंपळे, अँड. रत्नाकर पाटील, आमोद मुंडे, प्रमोद घासे, चेतन कवळे, योगेश पाटील, राजू विश्वकर्मा, संदीप गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
“अलिबाग–वडखळ महामार्ग तातडीने खड्डेमुक्त न केल्यास संतप्त जनता रस्त्यावर उतरेल आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल,” असा इशारा यावेळी देण्यात आला
