Home

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट; अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची दिली माहिती


 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट; अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची दिली माहिती

मुंबई (वार्ताहर)

राज्यातील काही जिल्ह्यांत प्रामुख्याने मराठवाडा तसेच, सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्याचा प्रस्ताव आल्यानंतर भरीव आर्थिक मदत देण्याचे आश्वासन मोदींनी दिल्याचे फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले. पुढील दोन आठवड्यांमध्ये हा प्रस्ताव केंद्राला सादर केला जाण्याची शक्यता आहे.

राज्याला राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत मिळावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पत्राद्वारे केली आहे. त्या संदर्भातील पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गुरुवारी मुंबईमध्ये देण्यात आले. या पत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत येऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

राज्य आपत्ती निवारण निधीतून शेतकऱ्यांना राज्य सरकारने २ हजारांहून अधिक कोटींची तातडीची मदत दिली असली तरी, अतिवृष्टीने झालेले नुकसान पाहता केंद्राच्या भरीव निधीची गरज असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. अजून आढावा घेण्याचे काम पूर्ण झालेले नसल्याने नुकसानीचा नेमका आकडा सांगता येणार नाही. शिवाय, येत्या दोन दिवसांमध्ये (२७-२८ सप्टेंबर) पुन्हा अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. केंद्राला एकदाच प्रस्ताव द्यावा लागतो, त्यानंतर त्यामध्ये बदल करता येत नाही. शेतीच्या नुकसानीचा पूर्ण आढावा घेऊन राज्याकडून केंद्राला प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


Previous Post Next Post