पाकिस्तानने आशिया कपची ट्रॉफी चोरली? टीम इंडियाचं ट्रॉफीशिवाय सेलिब्रेशन
पराभवानंतर पाकड्यांचा रडीचा डाव; प्रेझेंटेशनला एक तास उशीर; सामना संपल्यानंतर मैदानात ड्रामा
दुबई(वृत्तसंस्था)
टीम इंडियाने आशिया कप जिंकून इतिहास रचला. आशिया कपच्या फायनलमध्ये पहिल्यांदाच भिडणाऱ्या पाकिस्तानला टीम इंडियाने जागा दाखवली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ९ व्यांदा आशिया कपवर नाव कोरलं. मात्र, पाकिस्तानने पुन्हा लायकी दाखवली. विजयानंतर बक्षिस समारंभाच्या वेळी मोठा गोंधळ झाला. पाकिस्तानच्या खेळाडूंनी मैदानावर परतण्यास मोठा विलंब केल्यामुळे भारतीय संघ आणि व्यासपीठावरील मान्यवरांना वाट पाहावी लागली. तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून विजेतेपदाची ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतला. शेवटपर्यंत भारतीय संघाने ट्रॉफी घेतली नाही. त्यानंतर मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन निघून गेले. अखेर ट्रॉफी न घेता भारतीय खेळाडूंनी विजयाचे सेलिब्रेशन केले.
भारत आणि पाकिस्तान संघांमधल्या आशिया चषकाच्या फायनलइतकाच या स्पर्धेचा तासाभरापेक्षा जास्त वेळ लांबलेला पारितोषिक वितरण सोहळाही तितकाच नाट्यमय ठरला. कारण आशियाई क्रिकेट कौन्सिल म्हणजे एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याहस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास भारतीय संघानं स्पष्ट नकार दिला. एसीसीनं आपल्याला ही माहिती दिल्याचं सांगून समालोचक सायमन डूल यांनी पारितोषिक वितरण सोहळा थोडक्यात गुंडाळला. टीम इंडियाच्या खेळाडूंनी नाराज न होता, ट्रॉफीशिवाय सेलिब्रेशन केलं. त्यावेळी पाकिस्तानची टीम ड्रेसिंग रुममधून लपूनछपून टीम इंडियाचं सेलीब्रेशन पाहत होती. एसीसीचे प्रमुख आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून टीम इंडियाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याबद्दल बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले, "भारत एका देशाविरुद्ध युद्ध करत आहे आणि त्या देशाच्या नेत्याने ट्रॉफी सोपवायची होती.
आपल्या देशाविरुद्ध युद्ध करणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडून आपण ट्रॉफी स्वीकारू शकत नाही. म्हणूनच आम्ही ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, परंतु याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती आपल्या देशाला देण्यात येणारी ट्रॉफी आणि पदके त्याच्या हॉटेलच्या खोलीत घेऊन जाईल. हे पूर्णपणे अनपेक्षित आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया पुढे म्हणाले, "बीसीसीआय अत्यंत आनंदी आहे आणि अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करतो. पाकिस्तानविरुद्धचे तिन्ही सामने एकतर्फी होते आणि देशाला गौरव मिळवून दिल्याबद्दल आम्ही आमच्या खेळाडूंचे आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन करतो. आम्हाला आमच्या संघाचा आणि क्रिकेट मैदानावर त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा खूप अभिमान आहे. आमच्या सशस्त्र दलांनी सीमावर्ती भागातही असेच केले आहे. आता, दुबईमध्येही असेच घडले आहे, म्हणून हा एक अद्भुत क्षण आहे... आम्ही भारतीय संघाला ₹21 कोटी रोख बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. हे बक्षीस खेळाडू आणि सर्व सपोर्ट स्टाफमध्ये वाटले जाईल.