राज्यात अस्मानी संकट आणखी गडद होण्याची भीती; आठवडाअखेर पावसाचा जोर पुन्हा वाढणार; मराठवाड्याला पुन्हा झोडपण्याची शक्यता
मुंबई(वार्ताहर)
राज्यात एकीकडे पावसाने थैमान घातलं आहे, अनेक जिल्ह्यात जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे. शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अशातच हे अस्मानी संकट आणखी गडद होण्याची भीती वर्तवली जात आहे. आठवडाअखेर पावसाचा जोर राज्यात पुन्हा एकदा वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात देखील पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती आहे. या आठवड्याच्या अखेर कोकण विभागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच, विजांच्या कडकडाटासह मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे 27 ते 29 सप्टेंबर या कालावधीत मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागासह मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या राज्यात पाऊस पडतो आहे. मात्र येत्या दोन दिवसांत तो प्रभाव पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊन शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील आठवडाही पावसाचा ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात येत्या तीन दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज आहे. त्यानंतर पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली. आधीच अवकाळी व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच पुन्हा आठवडाभर पावसाचा इशारा मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अंदाजानुसार दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता असून, २६ तारखेपासून कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव अधिक जाणवेल.