पिक नुकसानीसाठी २,२१५ कोटींची मदत जाहीर; राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
मुंबई
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण मराठवाड्यात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाने शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान केले आहे. पावसाच्या या रौद्ररुपाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी 2 हजार 215 कोटींची मदत जाहीर केली आहे.
महाराष्ट्रात अतिवृष्टीने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जात होती. याबाबत आता मोठा निर्णय घेण्यात आला असून 2 हजार 215 कोटींची नुकसान भरपाईसाठीची मदत जाहीर करण्यात आली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने ही मोठी घोषणा केली आहे. 31. 64 लाख लोकांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे. जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली, त्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. शेत पीक नुकसानीसाठी मदत म्हणून राज्यातील ३१.६४ लाख शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटी रूपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जाहीर कऱण्यात आला आहे. खरीप २०२५ मधील मदतीचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार, मदत जाहीर कऱण्यात आली आहे.
हिंगोली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर अन् नाशिकचा समावेश आहे. त्यासाठी 2,215 कोटींच्या मदतीला मंजूरी देण्यात आली आहे. हा निधी आजच शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करता येईल. यामध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांचा आणि मराठवाड्यातील धाराशिवसह नांदेड आणि बीडमध्ये मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या पट्ट्याचा समावेश आहे. तर आता पावसामुळे जे नुकसान झाले आहे. त्याचा आढावा सुद्धा घेतला जात आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वारंवार विरोधी पक्ष करत आहेत. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील नुकसानग्रस्त गावांची, जिल्ह्यांची विभागवार आकडेवारी तयार करण्यात आली आहे. युद्धपातळीवर ही मदत आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. अनेक भागात अद्यापही पाणी आहे, त्यामुळे तिथे पंचनामे झालेले नाहीत. पाणी ओसरल्यावर याठिकाणचे पंचनामे करण्याचे कामही करण्यात येणार आहे.