Home

राज्यात आज विजांसह जोरदार पावसाची शक्यता;रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, बीड जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज


राज्यात आज विजांसह जोरदार पावसाची शक्यता;रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, बीड जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

मुंबई(वार्ताहर )

मॉन्सूनच्या परतीची वाटचाल सुरू असतानाच राज्यात दमदार पाऊस कोसळत आहे. आज राज्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, बीड जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण कर्नाटकपासून कोमोरीन भागापर्यंत दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यातच राज्यात जोरदार पावसाने दाणादाण उडवून दिली असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान होत असून, आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, बीड जिल्ह्यांत जोरदार पावसाची, तर रायगड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात हलक्या सरींचा अंदाज आहे.

राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पुढचे दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. यादरम्यान अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून, मुंबईत पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकणाला पुन्हा मुसळधार पाऊस झोडपणार असून, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाचा व्यक्त करण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) रविवारी (ता. १४) पश्‍चिम राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यानंतर मंगळवारी (ता. १६) मॉन्सूनने राजस्थानच्या आणखी काही भागासह गुजरात, पंजाब आणि हरियानाच्या काही भागांतून माघार घेतली आहे. मॉन्सूनच्या परतीची सीमा भटिंडा, फतेहबाद, पिलानी, अजमेर, दिसा, भूजपर्यंत असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

Previous Post Next Post