बांगलादेशला लोळवत भारताची थेट आशिया कपच्या फायनलमध्ये धडक
दुबई (प्रतिनिधी)
आशिया कप 2025 च्या सुपर फोरमधील महत्त्वाच्या सामन्यात भारताने तूफानी कामगिरी करत बांगलादेशचा पराभव केला आणि थेट फायनलमध्ये प्रवेश मिळवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची या आशिया कप 2025 मध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. दुबईत अभिषेक शर्मा अन् शुभमन गिलच्या वादळी खेळीनंतर 168 स्कोर उभारला. नंतर गोलंदाजांनीही उत्कृष्ट मारा करत बांगलादेशी फलंदाजांना रोखून धरले. या विजयामुळे भारताने आशिया कप २०२५ च्या अंतिम फेरीत जागा पक्की केली असून पुन्हा एकदा विजेतेपद पटकावण्याची संधी आहे.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सुरुवातीच्या तीन षटकांत बांगलादेश गोलंदाजांनी चांगलाच जोर दाखवला आणि स्कोअर फक्त 17 धावांवर रोखून धरला. पण चौथ्या षटकात तब्बल 21 धावा फटकावत भारताने लय पकडली. पहिले 3 षटके 17 धावा वरून पुढची 3 षटके गिल आणि अभिषेकच्या जोरावर तब्बल 55 धावा केल्या. असं करीत टीम इंडियाने पॉवरप्ले संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 72 धावा केल्या. मात्र गिलला मिळालेली चांगली सुरुवातीनंतर तो 29 धावांवर माघारी परतला.
पाकिस्तानविरुद्ध 74 धावांची खेळी साकारल्यानंतर अभिषेक शर्मा पुन्हा एकदा शतकाच्या उंबरठ्यावर थांबला. बांगलादेशविरुद्ध त्याने अवघ्या 25 चेंडूत अर्धशतक झळकावलं आणि दमदार 75 धावांची खेळी केली, पण तो दुर्दैवाने रनआऊट झाला. अभिषेकच्या विकेटनंतर भारतीय संघाची धावगती पण घसरली. तो 12व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर माघारी परतला आणि त्यानंतर पाच षटकांत केवळ 23 धावा जमल्या. शेवटच्या षटकांत हार्दिक पांड्याने तुफानी फटकेबाजी करत भारताचा डाव 160 धावांपलीकडे नेला.