Home

अंध असूनही हार न मानता धामापूरमधील चंद्रकांत देवळाटकर तयार करताहेत आकर्षक फ्लॉवर पॉट्स


 

अंध असूनही हार न मानता धामापूरमधील चंद्रकांत देवळाटकर तयार करताहेत आकर्षक फ्लॉवर पॉट्स

'शालेय शिक्षणातून मूल्यशिक्षण' च्या माध्यमातूनही कोकणातील शाळांमध्ये सादर केले अनेक कार्यक्रम 


रत्नागिरी

१९९० साली झालेल्या विषारी सर्पदंशामुळे संगमेश्वर तालुक्यातील पीर धामापूर येथील चंद्रकांत सीताराम देवळाटकर यांची दृष्टी गेली परंतू त्यांनी हार मानली नाही. अंध असूनसुद्धा त्यांनी जिद्दीच्या जोरावर 'शालेय शिक्षणातून मूल्य शिक्षण' नावाचा कार्यक्रम तयार केला व पूर्ण कोकण फिरून शाळांमध्ये कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमांद्वारे त्यांनी भाषेचे कौशल्य, कविता, समाजप्रबोधन, परिक्षांमध्ये योग्य उत्तराचे तंत्र, व जीवनाचा सकारात्मक विचार या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोचवल्या. इतकेच नाही तर आता ते अतिशय उत्कृष्ट पध्दतीने फ्लॉवर पॉट्ससुध्दा बनवत आहेत व त्यांची विक्रीसुध्दा करत आहेत. 

चंद्रकांत देवळाटकर यांचा जन्म १ जून १९६२ रोजी माखजनजवळील पीर धामापूर येथे झाला. जीवनाचा मार्ग खडतर असला तरी त्यांनी हर एक संकट पराभूत केले. १९९० साली झालेल्या विषारी सर्पदंशामुळे त्यांची दृष्टी गेली. परंतू त्यांनी हार मानली नाही. अंध असतानासुद्धा त्यांनी केलेले असाधारण कार्य कौतुकास्पद असून प्रेरणादायी आहे. त्यांचे शालेय शिक्षण पीर धामापूर क्र. ५ शाळेत (इयत्ता १-४) व नंतर पीर धामापूर क्र. ४ शाळेत मुख्याध्यापक श्रीकृष्ण मनोहर म्हापणकार, श्री विनायक कृष्णा हातकंबकर व श्रीकृष्ण आप्पा पाटील यांच्या शिस्तीत व मार्गदर्शनाखाली पार पडले. या शिक्षणाचा त्यांच्यावर खोल प्रभाव असून हिंदी, इंग्रजी व मराठीत त्यांचे व्याकरण कौशल्य असाधारण आहे. त्यांनी ८वी व ९ वी न करता थेट १७ क्रमांकाचा अर्ज भरून रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कुलमधून शिक्षण पूर्ण केले.

दृष्टिहिन असतानाही चंद्रकांत देवळाटकर यांनी शिक्षणाचा वसा हरवला नाही. त्यांनी 'शालेय शिक्षणातून मूल्य शिक्षण' नावाचा कार्यक्रम तयार केला व पूर्ण कोकण फिरून शाळांमध्ये कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमांद्वारा त्यांनी भाषेचे कौशल्य, कविता, समाजप्रबोधन, परिक्षांमध्ये योग्य उत्तराचे तंत्र, व जीवनाचा सकारात्मक विचार या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोचवल्या. हे कार्यक्रम करण्यासाठी ते मंडणगड पासून दापोली खेड चिपळूण रत्नागिरी देवरुख, राजापूर, मालवण, सावंतवाडीपर्यंत गेले व असंख्य शाळांतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाला. मात्र इच्छा असूनही कोरोनामुळे हे कार्यक्रम त्यांना

थांबवावे लागले. यानंतरही ते थांबले नाहीत. त्यांनी एक नवा मार्ग स्वीकारला. त्यांनी फ्लॉवर पॉट्स तयार करून त्यांची विक्री करण्यास सुरवात केली. घरच्या घरी ते अतिशय उत्कृष्टरित्या फ्लॉवर पॉट्स बनवतात त्यांचा मुलगा त्यांना यासाठी साहाय्य करत असला तरी मुख्य निर्मितीचे काम ते स्वतः करत आहेत. हे फ्लॉवर पॉट्स संगमेश्वर, देवरुख, चिपळूण या भागांमध्ये विकले जात आहेत. चंद्रकांत देवळाटकर हे एक उत्कृष्ट कवी, भजनी बुवादेखील आहेत. कला त्यांच्या अंगी आहे. कारागीर असतानासुद्धा गर्वाचा लवेशही त्यांच्यात नसतो. 

त्यांनी समाजातील असंतुलनांवर भाष्य करणाऱ्या अनेक कविता लिहिल्या असून त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आदिमाया जाखडी गीते, सायूज्यमुक्ती भक्ती गीते असे एकाच पुस्तकात जाखडी गीते भक्ती गीताची मेजवानी आणि लोकप्रिय ठरलेला कविता संग्रह चंदनी शिसम तसेच चित्रांगी व रत्नपारखी या नावाने त्यांनी दोन दिवाळी अंकदेखील प्रसिद्ध केले आहेत. शाळांवरील कार्यक्रमांवरील ओढ असलेल्या चंद्रकांत देवळाटकर यांनी 'चंद्रमौळी चिंतामणी प्रस्तुत सन्मार्गदाता' या नावाने एक युट्युब चॅनेल सुरु केले असून त्यावर शैक्षणिक कार्यक्रम, भाषा कौशल्यांवरील छोट्या व्हीडिओज, कविता, भजने व प्रेरक विचार जनसामान्यांपर्यंत ते पोचवतात. चंद्रकांत देवळाटकर यांचा एकुलता एक मुलगा कॉंप्यूटर इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करत आहे. त्यांची एक मुलगी लग्न होऊन सासरी गेली असून 15 वर्षांपूर्वी त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली परंतू या एकटेपणावर मात करत त्यांनी आपला जीवनसंकल्प अधिक मजबूत केला आहे. ते एकप्रकारे कोकणचे वैभवच आहेत. दृष्टीहीन असूनदेखील ते धडधाकट शरीर असणाऱ्यांना लाजवेल असे कार्य करीत आहेत. त्यांचा आदर्श नक्कीच घेण्यासारखा आहे. 


Previous Post Next Post