Home

राज्यात धो-धो पाऊस; कोकणात आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा; पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा धोका



राज्यात धो-धो पाऊस; कोकणात आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा; पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा धोका 

मुंबई

 राज्यात सध्या धो-धो पाऊस कोसळत आहे. विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित भागात पावसाने जोर धरला आहे. पुढील पाच दिवस पावसाची हीच स्थिती कायम राहणार असून, त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सून बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्येही दाखल झाला आहे. तसेच उर्वरित अरबी समुद्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल हवामान तयार झाले आहे.

उत्तर कोकण ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत द्रोणिका रेषा स्थिर असून त्यामुळे कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, तसेच शेतकऱ्यांनीही हवामानाचा विचार करून शेतीचे नियोजन करावे, असे सांगण्यात आले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत, तर नद्या-नाल्यांना पूर आला आहे. आपत्कालीन यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात पावसाचा जोर सातत्याने वाढत असून, पुढील दोन दिवस राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 20 आणि 21 जून रोजी राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळणार आहे. काही ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये 20 जून रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी, तर एखाद्या भागात तीव्र अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. 21 जूनला पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता असून, मध्यम पाऊस कायम राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही दोन्ही दिवस पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


Previous Post Next Post