आयपीएल १७ मे पासून सुरू होणार; अंतिम सामना ३ जूनला होणार
मुंबई
भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर आता देशात पुन्हा एकदा आयपीएलचा धडाका सुरू होणार आहे. आयपीएलचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून उर्वरित 17 सामने खेळवण्यात येणार आहेत. येत्या 17 मे पासून पु्न्हा एकदा आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना 3 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.
भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माम झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आयपीएलचे सामने स्थगित करण्यात आले होते. आता ते पुन्हा सुरू होणार असून आहेत. सरकार, सुरक्षा संस्था आणि सर्व भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर, बीसीसीआयने 17 मे पासून स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वेळापत्रकात, दोन दिवशी दोन सामने खेळवले जातील. स्पर्धा पुन्हा सुरू झाल्यावर, पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात बंगळुरूमध्ये खेळला जाईल. उर्वरित सामन्यांसाठी जयपूर, बेंगळुरू, लखनौ, दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद या सहा शहरातील मैदानांची निवड करण्यात येणार आहे.
मूळ वेळापत्रकानुसार, प्लेऑफ टप्पा 20 मे पासून सुरू होणार होता. आता नवीन वेळापत्रकानुसार, प्लेऑफ टप्पा 29 मे पासून सुरू होईल. पहिला क्वालिफायर सामना 29 मे रोजी खेळवला जाईल. एलिमिनेटर सामना 30 मे रोजी, दुसरा क्वालिफायर सामना 1 जून रोजी आणि अंतिम सामना 3 जून रोजी खेळवला जाईल. प्लेऑफ सामन्यांची ठिकाणे नंतर जाहीर केली जातील. लीग स्टेजचा शेवटचा सामना 27 मे रोजी लखनौच्या स्टेडियमवर आरसीबी आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जाईल. रविवार, 18 मे रोजी दोन सामने खेळले जातील. राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज दिवसाच्या वेळी आणि दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज संध्याकाळच्या सामन्यात आमनेसामने येतील.