अखेरच्या चेंडूवर आरसीबीचा चेन्नईवर थरारक विजय; आयुष म्हात्रेची खेळी ठरली व्यर्थ
बंगळुर(प्रतिनिधी)
मुंबईकर आयुष म्हात्रेने धमाकेदार फटकेबाजी करत चेन्नईच्या संघाला विजयाची आशा दाखवली होती. आयुषने यावेळी ४८ चेंडूंत ९४ धावांची खेळी साकारली आणि त्यामुळे चेन्नई हा सामना जिंकेल, असे दिसत होते. मात्र शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या या सामन्यात आरसीबीने चेन्नईवर रोमहर्षक विजय मिळवला.
आरसीबीच्या संघाने दणदणीत फटकेबाजी करत २१३ धावा केल्या होत्या. चेन्नईला आयुष म्हात्रेने दमदार सुरुवात करून दिली होती, त्याला रवींद्र जडेजाने चांगली साथ दिली. पण आयुष बाद झाला आणि सामना रंगतदार अवस्थेत आला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर चेन्नईला जिंकण्यासाठी चार धावा हव्या होत्या, पण चेन्नईला त्या करता आल्या नाहीत आणि आरसीबीने यावेळी दोन धावांनी विजय साकारला. चेन्नईचा संघ २१४ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि त्यावेळी आयुष म्हात्रेने धडाकेबाज फटकेबाजी करत रंगत आणली. भुवनेश्वर कुमारसारख्या गोलंदाजाला त्याने अस्मान दाखवलं. आयुषने अर्धशतक झळकावले आणि तो शतकाच्या दिशेने कूच करत होता. आयुषचे शतक मात्र यावेळी सहा धावांनी हुकले. आयुषने यावेळी ४८ चेंडूंत ९ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ९४ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
विराट कोहली आणि जेकब बेथेल यांनी संघाला दणदणीत सुरुवात करून दिली. या दोघांनी ९७ धावांची दमदार सलामी दिली आणि त्यांनी चेन्नईच्या गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला. बेथेल आणि विराट दोघेही आक्रमक खेळी करत होती. या दोघांनीही अर्धशतकं झळकावली आणि त्यामुळे आता आरसीबी धावांचा डोंगर उभारणार, असे वाटत होते. पण त्याचवेळी बेथेल बाद झाला आणि ही जोडी फुटली. बेथलने यावेळी ८ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५५ धावांची खेळी साकारली. विराटही त्यानंतर जास्त काळ खेळू शकला नाही, विराटने ४ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६२ धावांची खेळी उभारली. हे दोघे बाद झाले आणि त्यामुळे आरसीबीची धावगती मंदावली. आरसीबी २०० धावांचा पल्ला गाठेल की नाही, असे वाटत होते. पण रोमारिओ शेफर्ड फलंदाजीला आला आणि त्याने १४ चेंडूंत ५३ धावांची वादळी खेळी साकारली. त्यामुळे आरसीबीच्या संघाला यावेळी २१३ धावा करताा आल्या.