दिलीप मोकल यांच्या तीन काव्यसंग्रहांचे प्रकाशन
अलिबाग (वार्ताहर)
मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून अलिबागमध्ये पार पडलेल्या साहित्यसंपदा आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलनात कवी, लेखक दिलीप मोकल (हाशिवरे) यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच पार पडले. प्रकाशन सोहोळ्यास जेष्ठ कवी, साहित्यिक अनंत देवघरकर, कवी, लेखक रमेश धनावडे, कवयित्री, लेखिका वैशाली भिडे, आगरी बोलीचे बादशहा म्हणून ओळखले जाणारे कवी, लेखक, आगरी व्याकरणकार चंद्रकांत पाटील, कवी, लेखक विलास नाईक, साहित्यसंपदाचे प्रकाशक वैभव धनावडे, पत्रकार नागेश कुलकर्णी, महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय हाशिवरे चे मुख्याध्यापक बी. डी. गायकवाड, मनोमय मिडीयाचे राहूल तवटे, पूनम धनावडे आणि कवी दिलीप मोकल यांच्या मातोश्री मथुराबाई मोकल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री जिविता पाटील यांनी केले. दीप प्रज्वलनानंतर दिलीप मोकल यांचे दिवंगत वडील आणि पत्नी विशाखा दिलीप मोकल यांच्या प्रतिमेला पुषपहार घालून त्यानंतर मंचावरील पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अनंत देवघरकर यांनी लेणे निसर्गाचे, रमेश धनावडे यांनी मी-तू पण एक झाले ' आणि वैशाली भिडे यांनी ' कैवल्याचे डोही ' या पुस्तकासाठी आपआपले मनोगत व्यक्त केले. अनंत देवघरकर यांनी आपला विद्यार्थी असलेल्या कवी दिलीप यांचे निसर्गाशी कसे दृढ नाते आहे पटवून दिले. कवी रमेश धनावडे यांनी कवी दिलीप मोकल यांच्या एकाच दिवशी प्रकाशित होणा-या तीन पुस्तकांविषयी बोलताना "एक आपत्य होण्यासाठी वर्ष वर्ष वाट पाहवी लागते, पण दिलीप मोकल यांनी एकाच वेळी तीन तीन काव्यकृतींना आज मराठी राजभाषा दिनी जन्मास घातले " अशी मार्मिक शब्दांत प्रतिक्रिया दिली. कवयित्री वैशाली भिडे यांनी दिलीप मोकल यांच्या संवेदनशील मानाचं प्रतिबिंब कैवल्याचे डोही या पुस्तकातून उमटल्याचे सांगितले. चंद्रकांत पाटील यांनी संस्कृतातील काही श्लोकांचा अर्थ सांगत कवी दिलीप यांचे लिखाण या श्लोकांप्रमाणे कसे चपखल आहे हे पटवून दिले. सर्व मान्यवरांचे मनोगत ऐकून कवी दिलीप मोकल यांच्या मातोश्री भावूक झाल्या आणि त्यानंतर संपूर्ण उपस्थितांच्याही भावना दाटून आल्या. आदर्श शिक्षिका नंदिनी पाटील यांनी दिलीप मोकल यांच्या मित्रपरिवारातर्फे तर धनंजय मोकल यांनी त्यांच्या कुटुबियांच्या वतीने आपआपले विचार व्यक्त केले. या दरम्यान कवयित्री सलोनी बोरकर यांनी दिलीप मोकल यांच्या लेणे निसर्गाचे या पुस्तकातील ' कोंकणमेवा ' या कवितेचे सादरीकरण केले. शेवटाला कवी दिलीप मोकल यांनी मनोगतासोबत आभार व्यक्त करताना हा कवितेचा प्रवास कसा सुरू झाला याविषयी बोलून तीनही पुस्तके कशी वेगळी आहेत हे सांगितले. ' लेणे निसर्गाचे ' या शब्दात जसा निसर्ग आहे तसेच मी-तू पण एक झाले या पुस्तकाच्या कवितांमध्ये वैचारीक तर ' कैवल्याचे डोही ' च्या कविता, अभंगरचना, संतकाव्यामधून आध्यात्मिक विचार मांडण्यात आल्याचे सांगितले
