Home

पत्नीचा गळा आवळून खून करून सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची गळफास घेवून आत्महत्या; नाशिकमधील धक्कादायक घटना



पत्नीचा गळा आवळून खून करून सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची गळफास घेवून आत्महत्या; नाशिकमधील धक्कादायक घटना

नाशिक(वार्ताहर)

आजारी असलेल्या पत्नीच्या वेदना पाहू शकत नसल्याने मी तिला मुक्त करतो आणि स्वतःही मुक्त होतो. आमच्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये. पत्नी लता हिला नवीन साडी, मंगळसूत्र, जोडवे घालून तिच्यावर अंत्यसंस्कार करावेत. अंत्यसंस्काराचा खर्च कोणीही करू नये, त्याची तजवीज मी करून ठेवली आहे, अशी चिठ्ठी लिहून ठेवत 78 वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक पतीने पत्नीचा गळा आवळून तिला संपवले व त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिकमधील जेलरोड येथे बुधवारी सायंकाळी घडली. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मुरलीधार जोशी (76) व मुरलीधर रामचंद्र जोशी (78, दोघे रा. एकदंत सोसायटी, जेल रोड) अशी या दाम्पत्याची नावे आहेत. मुरलीधर जोशी यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह दान करण्यात आला. तर लता जोशी यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी दसक येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. जेलरोड सावरकरनगर भागातील दुर्गा माता मंदिरामागे असलेल्या एकदंत सोसायटीत सेवानिवृत्त जोशी दाम्पत्य अनेक वर्षांपासून वास्तव्यास होते. त्यांची मुले मुंबईत वास्तव्यास आहेत. लता जोशी दीर्घ आजाराने पीडित असल्याने अंथरुणाला खिळून होत्या. उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने व पत्नीच्या वेदना असह्य होत असल्याने मुरलीधर जोशी त्रस्त होते. 

बुधवारी रात्री त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या सीमा राठोड जोशी यांच्या घरी आल्यानंतर जोशी दाम्पत्य मृतावस्थेत दिसल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत उपनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व मुरलीधर जोशी यांनी लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेत मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवले. जोशी यांची मुले संदीप आणि प्रसन्न हे दोघेही मुंबई येथे वास्तव्यास असून, घटनेची माहिती मिळताच ते मध्यरात्री नाशिकला दाखल झाले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पार पाडत गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दरम्यान, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर जोशी यांची सुसाईड नोट समोर आली आहे. त्यात त्यांनी म्हटले होते की, मी मुरलीधर रामा जोशी. माझ्या पत्नीला मी स्वर्गलोकी पाठवलं आणि त्यानंतर मी तिच्यासोबत जात आहे. पत्नीच्या आजाराला कंटाळून आत्महत्या करत आहे. याच्याशी कोणाचा काहीही संबंध नाही. मी खुशीने आत्महत्या करत आहे. तसेच मी लताचा गळा दाबून शेवट करत आहे. पोरांनी मला माफ करावे. सीमाने (गृहसेविका) खूप सेवा केली. तिला माझ्याकडून 50 हजार रुपये चालू खात्यातून द्यावे. ती बाहेर गेली असताना मी हे कृत्य करत आहे. तिचा संबंध नाही. तिच्या मुलाची फी भरण्यासाठी पैशांचा उपयोग होईल. लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले पाच हजार अंत्यविधीसाठीचे पैसे आहेत. मंगळसूत्र, जोडवी आहेत. ते लताला घालावेत. नंतर सीमा राठोड हिला द्यावेत. माझे देहदान करावे. लताचा तुमची इच्छा असल्यास अंत्यविधी करावा. माझी आत्महत्या फेल झाली तर मात्र वृद्धाश्रमात ठेवावे. माझ्या कृत्यास कोणीही जबाबदार नाही, असे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले होते. 

Previous Post Next Post