Home

पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सवर मिळवला मोठा विजय


पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सवर मिळवला मोठा विजय

लखनौ(प्रतिनिधी)

 यजमान लखनौच्या संघातील एकही खेळाडू अर्धशतक झळकावून शकला नाही, पण तरीही त्यांनी १७१ धावा उभाल्या होत्या. पण या आव्हानाचा सहजपणे पाठलाग पंजाब किंग्सच्या संघाने केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे लखनौच्या संघावर घरच्याच मैदानात पराभव पत्करण्याची नामुष्की ओढवली. लखनौचा हा दुसरा पराभव ठरला तर पंजाबच्या संघाला हा दुसरा विजय होता. 

पंजाबच्या विजयात अर्शदीप सिंगने तीन विकेट्स घेत दमदार कामगिरी केली, तर प्रभसिमरन सिंगच्या धडाकेबाज सुरुवातीमुळे त्यांना हा सामना ८ विकेट्स राखत जिंकता आला. लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने पुन्हा एकदा लाज काढली आणि त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाल्याचे पाहायला मिळाले. श्रेयसने यावेळी नाबाद ५२ धावांची खेळी साकारली. लखनौच्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी पंजाबचा संघ मैदानात उतरला आणि त्यांना प्रभसिमरन सिंगने दणक्यात सुरुवात करून दिली. प्रभसिमरनने सुरुवातीपासूनच तुफानी फटकेबाजी केली आणि जलदपणे आपले अर्धशतक झळकावले. प्रभिसिमरनचा अप्रतिम झेल यावेळी सीमारेषेवर लखनौच्या दोन खेळाडूंनी मिळून पकडला. प्रभसिमरनने यावेळी ३४ चेंडूंत ९ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६९ धावांची दमदार खेळी साकारली. तो बाद झाला आणि श्रेयस अय्यरने संघाची जबाबदारी सांभाळली.

अर्शदीपने पहिल्याच षटकापासून लखनौच्या संघाला धक्के द्यायला सुरुवात केली. पहिल्याच षटकात त्याने मिचेल मार्शला बाद केले आणि लखनौची १ बाद १ अशी अवस्था केली. या सामन्यात सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या त्या कर्णधार ऋषभ पंतच्या फलंदाजीवर. कारण पंतला आतापर्यंत चांगली फलंदाजी करता आली नव्हती आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा सामना लखनौच्या घरच्या मैदानात रंगत होता. त्यामुळे पंतकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या. पंतलाही यावेळी चांगली संधी होती. पण पंतने यावेळीही लाज घालवल्याचे पाहायला मिळाले. कारण मोठा फटका मारण्याच्या नादात पंत फक्त दोन धावांवर बाद झाला आणि लखनौला मोठा धक्का बसला. पंतनंतर निकोलस पुरनने संघाला सावरले, त्याने ४४ धावांची खेळी साकारली. लखनौच्या संघातील एकाही खेळाडूला अर्धशतक पूर्ण करता आले नाही, पण तरीही त्यांनी १७१ धावांचा पल्ला गाठला होता.


Previous Post Next Post