टीम इंडियाची विजयी घौडदौड; दुसऱ्या वनडेतही इंग्लंडचा धुव्वा; रोहित शर्माचे वादळी शतक
कटक(वृत्तसंस्था)
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा सामना रविवारी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लडचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्माच्या वादळी शतकाच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लडचे 305 धावांचे आव्हान अवघ्या 44 षटकांमध्ये सहा गड्यांच्या मोबदल्यात हे टार्गेट पूर्ण केले.
भारत आणि इंग्लंडमधील दुसरा एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर विजयासाठी 305 धावांचे लक्ष्य ठेवले होते. 305 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियानेही वादळी सुरुवात केली. या सामन्याचा हिरो ठरलेल्या कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीपासून आक्रमकपणे खेळ करत इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. रोहितने फक्त 30 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर रोहितने अवघ्या 76 चेंडूंमध्ये धुवाँधार खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 338 दिवसांनी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 475 दिवसांनी शतक ठोकले. त्याने 90 चेंडूत 119 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 7 षटकार आणि 12 चौकार मारले.
विराट कोहली वगळता टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने प्रभावी खेळी केली आणि हे इंग्लंडने दिलेले लक्ष्य 45 षटकांत पूर्ण केले. या विजयासोबतच भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 2- 0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. यासोबतच टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर सलग सातवी एकदिवसीय मालिका जिंकली. तत्पुर्वी इंग्लंडकडून बेन डकेट आणि जो रूट यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. दोघांनीही अर्धशतके ठोकली. डकेट 65 धावा करून बाद झाला, तर रूट 69 धावा करून बाद झाला. जोस बटलरने 34 धावांचे योगदान दिले. दरम्यान, टीम इंडियाच्या विजयापेक्षाही खास म्हणजे या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला सूर गवसला. रोहित शर्माने जवळजवळ एक वर्षानंतर शानदार शतकी खेळी खेळून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुभ संकेत दिले.