सत्तेत येण्यासाठी लाडकी बहीण योजना-माजी आमदार बच्चू कडू
मुंबई। प्रतिनिधी
निवडणुकीच्या तोंडावर आणण्यात आलेली लाडकी बहीणी ही योजना अजूनही चांगलीच चर्चेत आहे. लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा सरसकट पैसे वाटण्यात आले. तेव्हा पात्रतेचे निकष पाळण्यात आले नाहीत आणि सरकार आल्यानंतर मात्र सरकारने पात्रतेचे निकष कडक केले. तसेच, ज्या बहिणी अपात्र ठरतील त्यांच्याकडून आधी देण्यात आलेले पैसे वसूल करण्यात येतील असेही जाहीर केले आहे. यामुळे विरोधकांनी देखील सरकारला लक्ष्य केले आहे, असे माजी आमदार बच्चू कडू म्हणाले.
लाडकी बहीण योजनेची चौकशी केली पाहिजे. निवडणूक आयोगाने जर खरोखर पारदर्शक पद्धतीने चौकशी केली तर थेट नेत्याच्या खिशातून पैसे न जाता बजेटमधून सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन मतं ओढण्याचा प्रयत्न झालेला आहे. म्हणजे ही योजना लाडक्या बहिणींसाठी नव्हतीच सत्तेत येण्यासाठी होती. मग सत्तेत येण्यासाठी ज्यांनी दोन महिन्यात करोडो लाडक्या बहिणींची चौकशी, चाचपणी न करता पैसे जाहीर करून दिले. याला जबाबदार कोण? असा सवालही बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाडक्या बहिणींची फसवणूक करत गुन्हा केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
एकूण लाडक्या बहिणींची परिस्थिती बघता या विरोधात ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले आहेत त्यांनी खरं तर रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे, असे सल्लावजा आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे.
