महाकुंभमेळ्यात पुन्हा अग्नितांडव; सेक्टर १८ मध्ये तंबूंना भीषण आग
प्रयागराज(प्रतिनिधी)
उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये पुन्हा आग लागल्याची घटना समोर आली आहे. सेक्टर १८ मधील शंकराचार्य मार्गावरील हरिहरानंद कॅम्पमध्ये ही आग लागली. महाकुंभ मेळ्यामध्ये पुन्हा आग लागल्याची घटना घडल्यामुळे घटनास्थळावर गोंधळाचे वातावरण आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आग लागण्यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. सेक्टर १२ मधील ज्योतिष पीठातील शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या छावणीत आग लागली. सकाळी ७ वाजताच्या सुमारास छावणीत दोन ठिकाणी आग लागल्याने गोंधळ उडाला होता. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याआधी, याआधी ३० जानेवारी रोजी महाकुंभाच्या सेक्टर २२ मधील अनेक तंबूंना आग लागल्याची घटना घडली. या आगीत १५ तंबू जळून खाक झाले होते. महाकुंभमेळ्यातील सेक्टर २ मध्ये दोन गाड्यांना आग लागल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी वेळीच घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. १९ जानेवारी रोजी महाकुंभमेळ्याच्या सेक्टर १९ मध्ये आग लागल्याची घटना घडली होती. जेव्हा एका तंबूमध्ये ठेवलेल्या गवताला आग लागली. या घटनेत सुमारे १८ तंबू जळून खाक झाले होते. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
