Home

मीरारोडमध्ये एकाच ट्रॅकवर २ लोकल ट्रेन आल्या समोरासमोर; मोटरमनच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला


 

मिरारोडमध्ये एकाच ट्रॅकवर २ लोकल ट्रेन आल्या समोरासमोर; मोटरमनच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला 

मुंबई (प्रतिनिधी)

मुंबईकरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलबाबत दररोज काही ना काही बातम्या येत असतात. मात्र आज प्रवाशांचा श्वास रोखणारी घटना समोर आली आहे. दोन लोकल ट्रेन एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्याची घटना मीरारोडमध्ये घडली आहे. दोन्ही लोकल अचानक समोरासमोर आल्याने प्रवाशांच्या उराच धडकी भरली व चलबिचल सुरू झाली. पश्चिम रेल्वेच्या मीरा रोड स्टेशनवर हा प्रकार घडला. मात्र, मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ऐन गर्दीच्या वेळी मिरा रोड रेल्वे स्थानकावर दोन्ही ट्रेन समोरासमोर येण्याची घटना घडली आहे. संध्याकाळच्या वेळी चाकरमानी कामावरून घरी परतत असल्याने सर्व लोकल गर्दीने खचाखच भरून धावत असतात. त्यामुळे चर्चगेटहून वसई-विरारकडे जाणाऱ्या लोकलला नेहमीप्रमाणे आजही मोठी गर्दी होती. मिरा रोड रेल्वे स्थानकावर संध्याकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर अचानक एकाच ट्रॅकवर दोन लोकल आल्याने मोठा गोंधळ उडाला. अचानक एकाच ट्रॅकवर दोन लोकल आल्यामुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली. दादरकडून वसईच्या दिशेनं जात असलेल्या लोकलच्या ट्रकवरच दुसरी लोकल आली. 

मात्र मोटरमनच्या सतर्कतेमुळे काही मिटर अंतरावर दोन्ही ट्रेन थांबवण्यात आल्या व प्रवाशांनी सुटकेचा निस्वास सोडला. दोन्ही लोकल ट्रेन समोरासमोर येऊ लागल्याने स्टेशनवर उभे असणाऱ्या प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली होती. स्टेशनवरील प्रवासी ओरडत होते. दोन्ही लोकल एकाच ट्रकवर आल्याने मिरारोड रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक ३ वरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. मात्र, काही वेळाने मिरारोड आणि भाईंदर रेल्वे सेवा सुरळीत झाली. सिग्नल बिघाड झाल्याने ही घटना घडल्याचं सांगितले जात आहे. सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोन्ही लोकल ट्रेन १० मिनिटे समोरासमोर उभ्या होत्या. या प्रकारानंतर प्रवासी घाबरून रेल्वे ट्रॅकवर उतरले आणि पायी चालू लागले. काहींनी दुसरी ट्रेन पकडून पुढे मार्गस्थ होण केले. 

Previous Post Next Post