Home

अलिबागमध्ये राज्य पतसंस्था फेडरेशनच्या सहकार दिंडीचे भव्य स्वागत ‌


 ‌ 

‌अलिबागमध्ये राज्य पतसंस्था फेडरेशनच्या सहकार दिंडीचे भव्य स्वागत

‌ -ढोल-ताशांच्या गजरात लक्षवेधी शोभायात्रा, सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिती

‌अलिबाग(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त मुंबईहून शिर्डीकडे निघालेल्या धनंजयराव गाडगीळ सहकार दिंडीचे अलिबाग येथे  ढोल-ताशा, लेझीमच्या गजरात पुष्पवृष्टी व फटाक्यांची आतषबाजी करीत जोरदार स्वागत करण्यात आले. यानिमित्त अलिबाग शहरातून जल्लोषात काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत अलिबागसह रायगड जिल्ह्यातील पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेषतः महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. "जय सहकार", "अभिमान सहकाराचा, स्वाभिमान पतसंस्थांचा" अशा गगनभेदी घोषणा देत सहकाराचा जागर करीत निघालेल्या या दिंडीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

‌ युनोच्या आवाहनानुसार यंदाच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने शिर्डी येथे येत्या ८ व ९ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित केली आहे. या परिषदेच्या अनुषंगाने राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाराचे जनक धनंजयराव गाडगीळ यांच्या नावाने काढलेल्या या दिंडीचे गुरुवारी रात्री अलिबागमध्ये आगमन झाले. आज शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शहरातील डॉ. आंबेडकर चौकात या दिंडीचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रमोद जगताप, राज्य पतसंस्था फेडरेशनचे उपकार्याध्यक्ष तथा आदर्श नागरिक पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, कोकण विभागीय पतसंस्था फेडरेशन व कमळ नागरी पतसंस्थेचे संस्थापक गिरीश तुळपुळे, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी, रायगड जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष जे. टी. पाटील आदींनी स्वागत केले. दिंडीतील रथाचे पूजन केल्यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत वरील मान्यवरांसह राज्य पतसंस्था फेडरेशनचे सहसचिव शरद जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, सहाय्यक निबंधक श्रीकांत पाटील, रायगड जिल्हा बँकेचे संचालक परेश देशमुख, भरत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, अभिजित  पाटील,हेमंत पाटील, चंद्रकांत घोसाळकर, जगदिश कवळे,रमेश नाईक,योगेश मगर, कविता ठाकूर, नेटवीन कंपनीचे मसऊद सय्यद यांच्यासह अलिबाग शहर व रायगड जिल्ह्यातील विविध पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

‌अलिबागमध्ये या दिंडीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. विविध पतसंस्थांनी भव्य स्वागत कमानी उभारल्या होत्या. या दिंडीमुळे संपूर्ण अलिबाग शहर सहकारमय झाले होते.

‌ठिकठिकाणी महिलांनी या दिंडीतील राज्य पतसंस्था फेडरेशनच्या रथाचे मनोभावे पूजन केले. हुतात्मा चौकातील शहीद स्वातंत्र्य सैनिकांच्या स्तंभाला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली.

‌ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून सुरू झालेली ही दिंडी बस स्थानक, महावीर चौक, छत्रपती शिवाजी चौक,लोकनेते दत्ता पाटील भवन चौक, ठिकरूळ नाका, आदर्श पतसंस्था मार्गे रायगड जिल्हा सहकारी बँकेच्या मुख्यालयात पोहोचल्यानंतर तेथे बँकेच्या वतीने या दिंडीचे व त्यात सहभागी सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.

‌सहकाराचा ध्वज, विविध घोषणांचे फलक उंचावत दिंडीमध्ये सहभागी झालेले विविध पतसंस्थांचे प्रतिनिधी, फेटे बांधलेल्या पारंपरिक मराठमोळ्या वेशातील महिला, तरुण, सहकाराचे महत्त्व सांगणारे आकर्षक रथ, आकर्षक रांगोळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. यावेळी पुण्याच्या कलापथकाने दिंडी चालली सहकार गीत व इतर गीतांवर सुंदर नृत्याविष्कार सादर केला तर आळंदीच्या भजनी मंडळाने विठू नामाचा गजर करीत सुंदर भजने सादर केली. मुरूडचे पद्मध्वज ढोल-ताशा पथक, हटोळे येथील जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

‌ या दिंडीमध्ये आदर्श नागरी सहकारी पतसंस्था, कमळ नागरी सहकारी पतसंस्था, गृहलक्ष्मी पतसंस्था, सहयोग व्यापारी पतसंस्था, दत्ता पाटील अर्बन क्रेडिट सोसायटी, जनसेवा नागरी पतसंस्था, कुलाबा नागरी पतसंस्था, जय भवानी पतसंस्था, चंपावती ग्रामीण पतसंस्था, अपूर्वा पतसंस्था, सावता माळी पतसंस्था, सुमित्र ग्रामीण पतसंस्था, एकवीरा देवी पतसंस्था, सरखेल कान्होजी आंग्रे पतसंस्था, कोर्लई पतसंस्था, यशोधन पतसंस्था, महेश नागरी पतसंस्था आदी विविध पतसंस्थांचे प्रतिनिधी प्रचंड संख्येने सहभागी झाले होते. सहकाराचा जागर करीत निघालेली ही दिंडी नागरिकांमध्ये कुतूहलाचा विषय ठरली. दिंडीत सहभागी झालेल्यांनी "जय सहकार" अशा विविध घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. ही दिंडी महाड, कराड, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नारायणगाव, आळेफाटा, नाशिक, सिन्नर, अकोले, संगमनेर येथून ६ फेब्रुवारीला लोणी प्रवरानगर येथे पोहोचेल. त्या ठिकाणी नागपूरहून आलेल्या वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचा व या दिंडीचा संगम होईल. त्यानंतर या दोन्ही दिंड्या शिर्डी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत सहभागी होते. या दोन्ही दिंड्यांना भरघोस प्रतिसाद मिळत असून दिंड्यांमुळे राज्यभर सहकार मय वातावरण निर्माण झाले असल्याचे काकासाहेब कोयटे यांनी सांगितले.

Previous Post Next Post