नाशिकहून मुबंईला उपचारासाठी आलेलं संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड
उरण(वार्ताहर)
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणाऱ्या निलकमल फेरी बोटला एक सुसाट स्पीड बोटीने धडक दिली. या अपघातात नौदलाच्या तीन कर्मचाऱ्यांसह 13 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात नाशिकहून मुंबईला उपचारासाठी आलेलं संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेलं आहे.
दोन दिवस रुग्णालयात उपचार केल्यानंतर हे कुटुंब समुद्र सफरीचा आनंद घेण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया परिसरात आले होते. नौदलाच्या स्पीड बोटने प्रवासी बोटीला धडक दिली आणि या दुर्घटनेत आहिरे कुटुंबीयांचा बुडून मृत्यू झाला. राकेश आहिरे, पत्नी हर्षदा आहिरे आणि मुलगा निधेश आहिरे असे बोट दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबाचे नाव आहे. ते पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी होते.
राकेश आहिरे हे दम्याच्या आजारावर उपचारासाठी नेहमी मुंबईला येत असत. यावेळी ते पत्नी हर्षदा आहिरे (वय 28) आणि मुलगा निधेश (वय 5) यांच्यासह उपचारासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयात आले होते.
रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाला समुद्र सफरीचा आनंद घेण्यासाठी गेले. पण नौदलाच्या बोटीने प्रवाशी बोटीला दिलेल्या धडकेत संपूर्ण आहिरे कुटुंबीयाचा मृत्यू झाला. राकेश आहिरे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर पत्नी हर्षदा आणि निधेश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आहिरे कुटुंबातील तिघांचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
